विधिमंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने विधानभवनाचा आतील आणि बाहेरील परिसर आकर्षक व सुशोभित करण्यासाठी सजावटीवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्यात येत आहेत. रंगेबेरंगी आकर्षक अशा ३० प्रजातीच्या फुलांनी विधिमंडळाचा परिसर फुलणार आहे. यावेळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वारावर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. एकीकडे जनता महागाईने त्रस्त आहे, शेतक ऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना केवळ सजावटीवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात असल्याचे दिसून येत आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या सरबराईसाठी गेल्या दोन महिन्यापासून विधानभवन परिसरात जय्यत तयारी सुरू असून पाचशेपेक्षा अधिक कर्मचारी त्यासाठी दिवस रात्र काम करीत आहे. विधिमंडळ परिसरात असलेल्या जुन्या लॉनचे स्वरुप बदलवून त्या ठिकाणी विविध रंगाच्या व प्रजातीच्या फुलांनी हा परिसर सजविण्यात आला आहे. यामध्ये प्लुटोनिया, फ्रेंच मारिगोल्ड, कॉसमॉस, कोचिया, झिनिया अशा ३० च्या जवलळपास फुलांच्या प्रजाती विधिमंडळ परिसरातील लॉनवर लावण्यात आलेल्या आहेत. ही सर्व झाडे पुणे आणि कोकणातून बोलविण्यात आली आहे. याशिवाय विधिमंडळ इमारत आणि परिसरातील सुशोभिकरणावर भर देण्यात येत असून त्यावर आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. या विधिमंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने त्याचा समारोप नागपुरात करण्यात येणार होता मात्र तो पुढे ढकलण्यात आला असला तरी सजावटीमध्ये कुठेही कमी पडू नये यासाठी सार्वजानिक बांधकाम विभागाचे अधिकारी दिवस रात्र मेहनत करीत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्र्याचे आणि लोकप्रतिनिधीचे सभागृहाच्या प्रवेशद्वावर गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. परिसरात असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यालय आणि बाहेरील परिसर सुशोभित केला जात आहे. विधानसभेच्या मागील भागात असलेले लॉन सुशोभित केले जात असून त्या ठिकाणी त्या ठिकाणी केवळ मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
झाडांना आकार देणे, लॉन कटिंग, नवीन झाडे लावण्याचे काम परिसरात सुरू असून त्यासाठी पुणे आणि नागपुरातील ५० पेक्षा अधिक कारागिर काम करीत आहेत. परिसरात सहा ठिकाणी लँडस्केपिंग करण्यात येणार आहे. यात दादासाहेब कन्नमवारांचा पुतळा तसेच प्रवेशद्वाजवळील पिंपळाच्या झाडांचा समावेश आहे. या शिवाय प्रत्येक मंत्र्याच्या खोल्यासमोर शोभेची झाडे असलेल्या कुंडय़ा ठेवल्या जात आहे.
विधिमंडळ परिसरात यावर्षी प्रथमच कार्पोरेट दर्जाचे कॅबिनेटच्या बैठकीसाठी सभागृह तयार करण्यात आले आहे, या सभागृहाच्या बाहेर आणि आतसुद्धा फुलांची सजावट केली जाणार आह्े. प्रत्येक मंत्र्याच्या खोल्यांमध्ये एलसीडी मॉनिटर लावण्यात आले आहे. कॅबिनेटच्या बैठकीसाठी असलेले सभागृहासोबत मंत्र्याच्या खोल्या वातानुकुलित राहणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या परिसरातील कार्यालयासमोर होणारी गर्दी बघता त्या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.
विविध समितीच्या कार्यालयांना ‘कार्पोरेट लुक’ देण्यात आला आहे. या संदर्भात सार्वजानिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी विधिमंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने विधिमंडळ परिसर खास सजावट करून अधिक आकर्षक केला जात आहे. सजावटीच्या बजेटबाबत काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला.      

Story img Loader