केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे कवित्व चार वर्षांनंतरही सुरूच आहे. राष्ट्रवादीकडून ऐनवेळी िरगणात उतरवण्यात आलेल्या आमदार विलास लांडे यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, तो पराभव लांडे यांना ‘जिव्हारी’ लागला, याचे उदाहरण शरद पवार यांनीच आपल्या शैलीत सांगितले व सर्वानीच दाद दिली.
शिरूरमध्ये प्रस्थ असलेल्या शिवसेनेच्या खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराभूत करण्याचा चंग राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी बांधला होता. त्यासाठी खुद्द शरद पवार िरगणात उतरणार असल्याचे सांगत सर्वेक्षण करून अंदाजही घेण्यात आले. गावोगावी, पारावर लढतीच्या चर्चा झडू लागल्या होत्या. मात्र, बऱ्याच नाटय़मय घडामोडींनंतर पवार माढय़ाकडे सरकले.
मग वळसेंचे नाव पुढे आले. राज्यातच रस असलेल्या वळसे यांनी लांडेंना तयार केले. राजकीय आखाडय़ात सगळ्या बाबतीत तरबेज असूनही कमी वेळ मिळाल्याने लांडे मोठय़ा फरकाने पराभूत झाले होते.
शुक्रवारी आकुर्डीत एका कार्यक्रमात पवार यांनी िपपरी-चिंचवडच्या विकासात अण्णासाहेब मगर यांचे योगदान सांगितले. चुकीची कामे सांगितल्यास त्यांना आवडत नसे. अजितपेक्षा दहापटीने जास्त अण्णासाहेब रागावत असत, अशी आठवण त्यांनी सांगितली. तेव्हा लांडेंनी मध्येच काहीतरी टिपणी केल्याने पवारांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली. विलासराजे दिल्लीत शिष्टमंडळे घेऊन येतात, हे नियमित करा, ते नियमित करा, अशा मागण्या करत असतात. आपल्याकडे जवळपास २५ निवेदने त्यांनी दिली आहेत. लोक विरोधात जाण्याची भीती ते सतत व्यक्त करतात. लोकभावनेच्या धास्तीने आपण चुकीची कामे करत नाही ना, याचा ते विचार करत नसावेत. कधी पराभव न पाहिलेल्या लांडे यांचा लोकसभेला पराभव झाला, तो त्यांच्या भरपूर जिव्हारी लागलेला दिसतोय, त्यामुळे काहीही झाले तरी लोक विरोधात जाता कामा नये, असा त्यांचा आग्रह दिसतो, असे पवारांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्री, अजित पवार, महापौर मोहिनी लांडे यांच्यासह सर्वच उपस्थितांनी जोरदार दाद दिली.

Story img Loader