* पोलीस, महापालिकेची यंत्रणा झोपलेली
* जागोजागी टोळ्यांची दादागिरी
* सामाजिक सुरक्षितताही धोक्यात

भिकाऱ्यांच्या टोळ्यांची उपराजधानीतील प्रत्येक चौकात उच्छाद मांडला असून त्यांची दादगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यशवंत स्टेडियम परिसर भिकाऱ्यांचा सर्वात मोठा अड्डा झाला असून या टोळीमधील महिला आणि मुले पंचशील चौक आणि संपूर्ण बर्डी परिसरात बळजबरीने भीक मागत आहेत. विशेषत: महिलांच्या टोळ्या भीक न दिल्यास अंगचटीला येणे, थेट खिशात हात घालणे, घाणेरडय़ा शिव्या देणे, भांडण उकरून काढणे असे प्रकार करीत असल्याने रस्त्यावरून जाणारे-येणारे वाहनचालक आणि सिग्नलवर थांबणारे प्रचंड दहशतीत आहे. या भिकारी टोळ्यांची दादागिरी पोलीस आणि महापालिका प्रशासन उघडय़ा डोळ्यांनी पाहत असून त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नसल्याने त्यांची हिंमत वाढत चालली आहे.
सणावाराचे दिवस पाहून टोळ्यांचे अड्डे ठरलेले असतात. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने भीक मागितली जाते. ‘टार्गेट’ करून पैसे गोळा केले जातात. या पैशाची नंतर आपसात वाटणी केली जाते. यात संबंधित अधिकाऱ्यांनाही ‘अर्थ’पूर्ण वाटा द्यावा लागत आहे. भिकाऱ्यांच्या टोळ्या मोठे मॉल्स, हॉटेल्स, रेस्टारंट्स, गर्दीची ठिकाणे या ठिकाणे मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. सदर, वर्धमाननगर, लक्ष्मीभुवन परिसर, कॉफी हाऊस परिसर, बर्डीवरील  हॉटेल्स, प्रतापनगर तर अड्डे झाले आहेत. सर्वात मोठा त्रास पंचशील चौकातून जाणाऱ्यांना होऊ लागला आहे. हा चौक म्हणजे भिकाऱ्यांचे राहण्याचे ठिकाण झाला असून गटागटांनी भिकाऱ्यांच्या टोळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांना दिवस-रात्र सतावत आहेत. तरीही ही दादागिरी पोलिसांना दिसत नाही.
यशवंत स्टेडियमसमोर तर टोळ्यांचा मुक्काम असतो. त्यांच्या आपसात भयानक मारामाऱ्या रोजच्याच आहेत. हिस्से-वाटणीवरून शिवीगाळ, लाठयाकाठय़ा घेऊन एकमेकांच्या अंगावर चालून जाणे आता नवे राहिलेले नाही. त्याच्याच बाजूला लागणाऱ्या पाणीपुरी, भेलपुरी, चायनीज ठेल्यांवर येणाऱ्या ग्राहकांच्या तोंडून खाण्याचे पदार्थ हिसकावून पळून जाण्यापर्यंत भिकाऱ्यांची मजल गेलेली आहे. भिकाऱ्यांची दहशत एवढाच हा विषय मर्यादित नाही. यातून भिकाऱ्यांचे देहविक्रयाचे नवे रॅकेट तयार होत आहे. भीक मागत हिंडणाऱ्या महिला अंगचटीला येणे, जाणीवपूर्वक स्पर्श करणे अशा प्रकारांनी वाहनचालकांना चेतवण्याचा प्रयत्न करतात. यानंतर चौकात एका बाजूला बोलून सौदा केला जातो. हे नित्याचे प्रकार आहेत. उपराजधानीची सामाजिक सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या टोळ्यांची संख्या अचानक कशी वाढली याचे कारणे अनेक आहेत. बाहेर राज्यातून हजारोंच्या संख्येने रेल्वेस्थानक, बसस्थानकावर भिकारी कुटुंबे येतात. त्यांच्या येण्या-जाण्यावर कोणी विचारण करीत नाही, त्यांचे राहणे, खाणे याची व्यवस्था ते कसे करतात हादेखील त्यांच्या ‘मॅनेजमेंट’चा भाग आहे. भिकाऱ्यांच्या टोळ्यांनी अनेक सामाजिक प्रश्न निर्माण केले आहेत. रस्त्यावर जाताना होणारी अडवणूक, पैशासाठी केली जाणारी बळजबरी हा गुन्हेगारी स्वरुपाचा भाग आहे. झोपडपटय़ांमध्ये यांचे अड्डे बनत आहेत. या टोळ्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना शहराबाहेर हटविणे अत्यंत गरजेचे आहे. भिकारी टोळ्यांची वाढ हे नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेचा दावा करणाऱ्या यंत्रणेचे प्रचंड अपयश आहे.     
महापालिकेचे कार्यकारी अभियंता (झोपडपट्टी विभाग) आर.एन. होतवानी यांनी भिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडे कुठलीच यंत्रणा नसल्याचे सांगून हात झटकले. मध्यंतरी दोन भिकारी पुनर्वसन केंद्रे सुरू करण्यात आली होती. परंतु, तीदेखील बंद पडल्याचे त्यांनी सांगितले. भिकाऱ्यांचा त्रास वाढल्याचे सहायक पोलीस आयुक्त (अजनी) गंगाराम साखरकर यांनी मान्य केले. भिकाऱ्यांच्या टोळ्याविषयी काही नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून यासंदर्भात गुन्हे शाखेचे एक विशेष पथकाला माहिती देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.