यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत विजय संपादन करणाऱ्या कॉंग्रेसच्या नंदिनी निलेश पारवेकर यांच्यासमोर सहानुभूतीची नव्याची नवलाई लवकरच संपणार असून, आव्हानांची ‘फिर अंधेरी रात’ त्यांना पहावी लागणार आहे. त्यामुळे प्रचंड आव्हानांना त्यांना सामोरे जाण्याची तयारी करावी लागत आहे. आपल्या पतीच्या अपघाती मृत्यूचे दुख उरात साठवून नंदिनी निवडणुकीला सामोरे गेल्या, हे विशेषच म्हटले पाहिजे.
सासरी आणि माहेरी राजकारणाचा प्रदीर्घ वारसा असूनही स्वतला राजकारणापासून कोसो दूर ठेवणाऱ्या नंदिनी यांनी कौटुंबिक कलहाला चव्हाटय़ावर न आणता आपल्या दोन लहान मुलींना घेऊन प्रचारात मूक उडी घेतली. ज्या मतदारसंघाचे आपण प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघाची मराठी भाषा त्यांना येत नाही. ती शिकणे हे एक आव्हानच आहे. नंदिनीचे माहेर कर्नाटकातील असल्यामुळे मराठी भाषा अवगत नाही. कर्नाटकी उच्चारांची लय असलेल्या मराठीतील दोन चार वाक्य बोलण्याचे त्यांनी केलेल्या धाडसाचे मतदारांनी कौतुक केले. पण, आता हा कौतुकाचा विषय उरला नाही, हे त्यांना जाणवत आहे. विधिमंडळाच्या कामकाजाचा आवाका आणि पध्दत समजून घेण्यासाठी, सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी मराठी शिकण्याचेही आव्हान आहेच. दुसरे म्हणजे, निलेश पारवेकरांचे विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे भावनिक आवाहन निवडणूक काळात खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके आदिंनी केले होते. मात्र, राजकारणातील ‘अबकड’ माहिती नसलेल्या नंदिनी यांच्यासमोर निलेश यांचे विकासाचे कोणते स्वप्न होते, हे जाणून घेण्याचेही आव्हान  आहे.
यवतमाळला अमेठी-रायबरेली करून दाखवीन, असे निलेश पारवेकर म्हणायचे. आता मिळालेल्या आमदारकीच्या एक वर्षांच्या काळात यवतमाळला अमेठी -रायबरेली कसे करायचे, याचा विचार नंदिनी यांना करावा लागेल. अर्थात, निलेश पारवेकर असते तरी हे स्वप्न एक वर्षांत साकार झाले नसते, हे खरे आहे. पण, निदान त्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे मतदारांना जाणवले पाहिजे. ‘मिशन-२०१४’ साठी सज्ज व्हायचे की, आमदारकीची बागडोर दुसऱ्या कुणाच्या हाती सोपवायची, हाही चच्रेचा विषय होणारच आहे. ज्या राष्ट्रवादीची निवडणुकीत मदत घेतली त्या राष्ट्रवादीच्या अटी पूर्ण करणे व कांॅग्रेसबद्दल असलेल्या त्यांच्या तक्रारी निस्तारणे, हे तर नंदिनींसमोर मोठेच आव्हान आहे.
नंदिनी पारवेकरांची उमेदवारी अवघ्या एक वर्षांसाठीच आहे. नीलेश पारवेकर असते तर त्यांनाच हा कालखंड मिळाला असता, असाही प्रचार करून कांॅग्रेसने सहानुभूती मिळविली होती, हे लक्षात घेतले तर २०१४ च्या निवडणुकीत नंदिनी यांना पुन्हा संधी मिळवायची असेल तर वर्षभर कठोर परिश्रम घेऊन मतदारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व विकासासाठी पक्षातील ज्येष्ठांसोबत सामान्य नागरिकांशी संपर्क वाढवण्याचेही आव्हान त्यांना पेलावे लागेल. शिवाय, जिल्ह्य़ातील व  मतदारसंघातील विरोधकांचा विरोध बोथट करण्याचेही काम करावेच लागणार आहे. ‘असेल माझा हरी तर..’ चे दिवस संपले आहेत. ‘कुछ करके दिखाऐंगे’ हे लक्षात घेऊन काम करावे लागेल. अर्थात, नंदिनी पारवेकरांनी जनसंपर्काचा धडाका सुरू करून शुभसंकेत दिले आहेत. त्यामुळे आपल्यासमोरील आव्हाने पेलण्याची त्यांची इच्छा दिसते. पण, त्यासाठी स्वकीयांची किती साथ मिळते आणि भविष्यात पक्षांचा ‘हात’ किती मजबूत होतो, हे लवकर दिसणारच आहे, यात शंका नाही.

Story img Loader