येऊ घातलेल्या वीज प्रकल्पांमुळे हा जिल्हा वाळवंट होत असताना राज्य शासनाने प्रकल्पांऐवजी ऑटोमोबाईल्स व टेक्सटाईल्स उद्योग आणण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच लघु उद्योजकांनी केले.
एमआयडीसी औद्योगिक संघटनेच्यावतीने हॉटेल ट्रायस्टार येथे चंद्रपूरचा औद्योगिक विकास, तसेच औद्योगिक नीती या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार हंसराज अहीर, आमदार शोभा फडणवीस, नाना शामकुळे, प्रा.अतुल देशकर, विदर्भ औद्योगिक फेडरेशनचे अध्या पातुरकर, बुट्टीबोरी औद्योगिक संघटनेचे महासचिव हेमंत अंबासेलकर, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विनायक बांगडे उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार मुनगंटीवार यांनी या जिल्ह्य़ात ऑटोमोबाईल उद्योगांना खऱ्या अर्थाने वाव असून मोठय़ा उद्योग समूहाने उद्योग टाकण्याची इच्छा व्यक्त केली तर सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली. खासदार अहीर यांनी या जिल्ह्य़ातील कच्चा माल उपयोगी येईल, असा पूरक उद्योगाला मदत करण्याचे आश्वासन दिले. सध्याची कोळसा व वीज नीती देशासाठी हानीकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आमदार शोभा फडणवीस यांनी या जिल्ह्य़ातील महाऔष्णिक वीज प्रकल्प बघता गंभीर पाणी समस्येला तोंड द्यावे लागेल, असे मत व्यक्त केले. आमदार अतुल देशकर व नाना शामकुळे यांनी स्थानिक उद्योगांना सर्व मदतीची तयारी दाखविली.
प्रास्ताविक भाषणात एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांनी महाग विजेमुळे या जिल्ह्य़ातील उद्योग बंद होण्याच्या वाटेवर असल्याची माहिती दिली. स्टील व स्पाँज आयरन कारखान्यांना लोह मिळत नसल्यामुळे, तसेच कोळशाचे भाव अस्मानाला टेकल्याने सात स्पाँज उद्योग अतिशय वाईट स्थितीात आहेत. तसेच या जिल्ह्य़ात औष्णिक वीज केंद्रांची आवश्यकता नसताना वीज केंद्रांची अक्षरश: लाईन लागली आहे. हा सर्व प्रकार या जिल्ह्य़ातील साधनसामुग्रीच्या मुळावर उठण्यासारखा असल्याची टीका त्यांनी केली. या कारणांमुळेच जिल्ह्य़ातील लोकांना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रसंगी राजेंद्र चाबल, शैलेंद्र रॉय, प्रदीप बुक्कावार व लॉयड मेटल्सचे शमीरभाई यांनी त्यांना येत असलेल्या तीव्र समस्यांची माहिती याप्रसंगी दिली. कार्यक्रमाचे संचालन शैलेंद्र रॉय व राजेंद्र चौबल यांनी केले. आभार विपीन कपूर यांनी मानले. कार्यक्रमासाठी चंद्रकांत गुप्ते, शेखू रहमान पटेल, उत्तम डाखरे, प्रदीप बुक्कावार, विपीन कपूर, डॉ. श्याम कुंदोजवार, शैलेंद्र राय, राजेश्वर चिंतावार, सोमेश खंडेलवाल, प्रमोद चव्हाण, रमेश गोयल, चंद्रकांत वासडे यांनी परिश्रम घेतले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा