शेकडो ऑटोंना फिटनेस प्रमाणपत्रच नाही
उपराजधानी म्हणवून घेणाऱ्या नागपूर शहरातील बहुतांश ऑटोरिक्षांची स्ेिथती प्रवास करण्याजोगी नाही, या वस्तुस्थितीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. १९९७ पासून नवीन ऑटोंना परमीट देण्यात आले नसल्याने जुनेच ऑटो शहरात सर्वत्र संचार करीत असून ऑटोरिक्षांचे चालक-मालक ऑटोच्या मेन्टेनन्सकडे मुळीच लक्ष देत नसल्याने अत्यंत धोकादायक स्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. असंख्य ऑटो चालविण्यासाठी ‘फिट’ नाहीत तरीही बिनधास्तपणे रस्त्यांवरून धावत असून प्रवाशांचा जीव टांगणीवर ठेवत आहेत. गरजू प्रवासी अगदीच नाईलाज म्हणून ऑटोतून प्रवास करतात. शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे ऑटोदेखील धोकादायक अवस्थेतील आहेत. येत्या २६ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू होतील. त्यावेळी पुन्हा एकवार असे विद्यार्थी लादलेले ऑटो रस्त्यावर बिनधास्त धावताना दिसतील. फिटनेस प्रमाणपत्रासाठी आरटीओत जाण्यापेक्षा ऑटोचालक जास्तीत जास्त फे ऱ्या करून पैसा कमावण्याच्या मागे लागले आहेत.
नागपुरातील ऑटो मीटरने चालत नाहीत, या तक्रारी आता जुन्या झाल्या असून प्रवाशांच्याही अंगवळणी पडल्या आहेत. अनेक ऑटोंचे फक्त सांगाडे उरले असतानाही या खटारा ऑटोंना रस्त्यावरून धावण्यासाठी कशी परवानगी दिली जाते, याचे गूढ सामान्य प्रवाशाला उलगडलेले नाही. शहरातील सरासरी १०० पैकी ६० अत्यंत वाईट स्थितीत आहेत आणि त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. शहरात प्रादेशिक परिवहन विभागाकडून अधिकृत परवानगी मिळालेले ९२५५  ऑटो चालविले जात आहेत. त्यापैकी ५५०० ऑटो फिटनेस टेस्टसाठी आले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून अनधिकृतपणे धावणाऱ्या ऑटोंची संख्या पाहता हा आकडा आणखी वाढला आहे. असे ऑटो प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणारे ठरू लागले आहेत. परंतु, संबंधित यंत्रणा त्याकडे सपशेल काणाडोळा करीत असल्याने त्यांची दादागिरी आता सहनशक्तीच्या पलीकडे चालली आहे.
मोटार वाहन कायदा १९८८ नुसार प्रत्येक ऑटोला आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र दरवर्षी मिळवावे लागते. नव्या वाहनांना यासाठी दोन वर्षांची सूट आहे. तीन चाकी ऑटोला फिटनेस प्रमाणपत्र चाचणीसाठी आरटीओ अधिकाऱ्याने किमान २ किमी पर्यंत चालवून पाहिले पाहिजे. यादरम्यान मीटर, ब्रेक्स, रिफ्लेक्टर, हेडलाईट्स, इंडिकेटर आणि प्रवाशांसाठी आसनांची सुयोग्य व्यवस्था याचीही तपासणी अपेक्षित आहे. यापैकी एकदेखील त्रुटी आढळली तरी ऑटोला फिटनेस प्रमाणपत्र दिले जात नाही. अलीकडेच आरटीओने ५०० ऑटोंवर फिटनेस प्रमाणपत्र नसल्याने कारवाई केली. यापैकी ३८७ ऑटो विविध पोलीस ठाण्यांमध्ये पडून आहेत. या ऑटोरिक्षांना १५ दिवसांचा अवधी फिटनेस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आरटीओने दिला आहे. जर त्यांनी यादरम्यान फिटनेस प्रमाणपत्र सादर केले नाही तर सदरहू ऑटोंना भंगारात मोडीत काढले जाणार आहे. शहरातील ऑटोरिक्षांची संख्या पाहता हा आकडा एकदम नगण्य आहे. याचा अर्थ अन्य धावणाऱ्या ऑटोंपैकी असंख्य ऑटो अत्यंत वाईट स्थितीत असतानाही चालविले जात असल्याने प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे स्पष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच गिरीपेठेतील आरटीओच्या कार्यालयात १५ ऑटोंची चाळणी करण्यात आली. यासाठी गॅस कटर आणि वेल्डिंगचा वापर करण्यात आला. यासंदर्भात काही ऑटोचालकांशी संपर्क साधला असता इन्शुरन्स शुल्क आवाक्याबाहेरचे असल्याने ऑटोचालक फिटनेस प्रमाणपत्र घेणे टाळत असल्याची बाब पुढे आली. काही शेजारी जिल्ह्य़ातील ऑटोदेखील नागपुरात धावतात, मग त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा एका ऑटोचालकाचा प्रश्न होता.

Story img Loader