शहरातील प्रमुख रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन, भूमिगत विद्युत वाहिनीचे काम, तसेच झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत १८७ घरकुलांचे बांधकाम व नवबौध्द योजनेत २६० घरकुलांच्या बांधकामासह विविध विकास कामे वष्रेभरात केल्याची माहिती महापौर संगीता अमृतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापौरपदाची सूत्रे स्वीकारून वष्रेभराचा कालावधी झाला असून ३६५ दिवसात विविध विकास कामे केल्याचे त्यांनी सांगितले. यात २५ कोटीचा निधी महापालिकेने प्राप्त केल्यानंतर या निधीअंतर्गत शहरातील मुख्य रस्त्याचे बांधकाम, नवीन भागात पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकणे, शहरातील मुख्य मार्गावरील भूमिगत विद्युत वाहिनीचे काम, बाबुपेठ परिसरात राजाभाऊ खोब्रागडे स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.
एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्ट्ी विकास कार्यक्रमाअंतर्गत ५७० घरकुलांकरिता निविदा प्राप्त झाल्या असून २०३ लाभार्थीनी हिस्सा भरणा केलेला आहे. त्यापैकी १८७ घरकुलांचे काम पूर्ण झाले, तर उर्वरीत घरकुलांची कामे सुरू आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजनेअंतर्गत ४४७ घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली असून त्यापैकी २६० घरकुलांच्या बांधकामांना सुरुवात झाली आहे. शासनाकडून १ अग्निशमन वाहन उपलब्ध करून दिले, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून ५.५० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. मागास क्षेत्र अनुदान निधीतून ३ कोटी २१ लाखाची निधी प्राप्त के ला असून या अंतर्गत कामे सुरू आहेत. महानगरपालिका कार्यालयीन इमारतीसह व्यापार संकुलाचे बांधकाम सुरू आहे. येत्या काळात शहरातील बाबुपेठ परिसरातील उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. सुविधा विकास अनुदान अंतर्गत विविध प्रभागात ६० कोटींची कामे करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत नागरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता खाजगी नळ व वैयक्तीक शौचालयांच्या बांधकामाकरिता ६ कोटी ५५ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. अल्पसंख्याकबहुल क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने २० लाखाची २ कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. राजीव आवास योजनेतून झोपडपट्टीमुक्त शहराच्या आराखडय़ाकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली शहरातील झोपडपट्टीचे सव्रेक्षण करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण निधीतून दलितेतर प्रभागातील विकास कामांसाठी ७६ लाख ३५ हजारांचा निधी मंजूर झाला असून या निधी अंतर्गत रस्ते विकास कामे करण्यात येणार आहे.
शहरातील कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गांधी चौकातील नेताजी नगर भवनाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी ६५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. रुग्णसेवेसाठी २ रुग्णवाहिका व १ शववाहिका खरेदी करण्यात येणार आहे. जटपुरा गेट जवळील जुन्या सरई मार्केटमध्ये मनपाच्या उत्पन्नात भर टाकण्याच्या उद्देशाने व नागरिकांना वाहनतळ व इतर सोयी सुविधा देण्यासाठी जटपुरा गेटजवळील जुन्या सरई मार्केटच्या ठिकाणी बी.ओ.टी.तत्वावर भव्य व्यापार संकुल उभारण्याचा प्रस्ताव आहे. शहरात बऱ्याच प्रभागांमध्ये मोकळय़ा जागेचा विकास करण्याचे काम ३ वर्षांत टप्याटप्याने हाती घेण्यात येणार असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही सर्व कामे करण्यात येणार असल्याचे अमृतकर यांनी सांगितले व या सर्व कामाला सर्वाचे सहकार्य लाभत असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी शहरातील अतिक्रणाच्या मुद्याविषयी विचारले असता हा मुद्दा सध्या हाती घेतलेला नाही व येत्या काळात या विषयी विचार करू, असे त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेला सभापती रामू तिवारी, संतोष लहामगे, अशोक नागापुरे, राजेश रेवल्लीवार, महेंद्र जैस्वाल, देविदास गेडाम, किशोर जोगेकर उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा