धर्मार्थ गोष्टींच्या नावाखाली पैसा जमा करायचा व तो एखाद्या मोठय़ा इव्हेन्टवर खर्च करण्याचा नवा प्रकार अकोल्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून होत आहे. श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगासाठी मोठय़ा प्रमाणात देणगी प्रवेशिकेच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा केले गेले. या देणगी प्रवेशिकेवर संस्थेचा नोंदणी क्रमांक, तसेच शुल्काचीही नोंद नाही. त्यामुळे या माध्यमातून जमा होणारा निधी किती व तो कुणाच्या खात्यात वळतो, असा प्रश्न उपस्थित होतो. या संदर्भात संस्थेचे अकोल्यातील प्रमुख कैलाश अग्रवाल व सचिव सुधीर इंगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आयोजनासाठी हा पैसे गोळा करत असल्याचे सांगितले. देणगीच्या नावाखाली सुरू असलेल्या या वसुलीबाबत त्यांनी मात्र मौन बाळगले.
आज अकोल्यात श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगाचे आयोजन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून करण्यात आले. या माध्यमातून देणगी प्रवेशिकेच्या नावाखाली लाखो रुपये गोळा केले गेले. महासत्संगाच्या कार्यक्रमाचा एकूण खर्च ३५ ते ५० लाख रुपयांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे त्यासाठी मोठय़ा प्रमाणात स्थानिकांकडून देणगी प्रवेशिकेच्या नावाखाली पैसे गोळा केला. आज या संदर्भात स्थानिक माधवनगरातील महासत्संग असलेल्या मैदानावरील स्टॉलला भेट दिली असता तेथे प्लॅटिनम नावाची देणगी प्रवेशिका दहा हजार रुपये, गोल्डन पाच हजार, सिल्व्हर दोन हजार व साधी देणगी प्रवेशिका ही सुमारे पाचशे रुपये किमतीची होती. या संदर्भात संबंधित स्टॉलचालकास विचारणा केली असता त्यांनी प्लॅटिनम प्रवेशिकेवर दोन लोकांना आत प्रवेश देण्यात येईल. त्यावर किंमत का नाही, अशी विचारणा केली असता त्यांनी या विशेष प्रवेशिका असल्याचे कारण पुढे केले व संवाद थांबविला. दरम्यान, अशा प्रकारे पैसा गोळा करणे अधिकृत नसल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले.
देणगी प्रवेशिकेसमोर किती कि मतीची (शुल्क) प्रवेशिका आहे, त्याचा अनुक्रमांक क्रमांक काय व त्या प्रवेशिकेवर कुठल्या नोंदणीकृत संस्थेसाठी देणगी दिली जात आहे, त्या देणगीचा वापर कशासाठी होणार आहे, याचा तपशील नव्हता. त्याचबरोबर यासंबंधी अकोल्यातील धर्मदाय आयुक्त कार्यालयातून अशा प्रकारे देणगी वसुलीची परवानगी घेतली असल्याचा उल्लेख या प्रवेशिकेवर आढळला नाही. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्टच्या कलम ४१(सी) अंतर्गत अशा प्रकारे देणगीच्या नावाखाली पैसे वसूल करणे गैरकायदेशीर असल्याचे मत एका विधिज्ञाने लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले. ज्या कामासाठी (धर्मार्थ) हा पैसा गोळा करण्याचा देखावा स्थानिकांनी सुरू केला आहे त्या कामासाठी याचा वापर होत नसल्याचे स्पष्ट होते. महासत्संगाच्या कार्यक्रमासाठी हा निधी खर्च होत असल्याची बाब आयोजकांनी मान्य केली आहे. ही गंभीर बाब असून या माध्यमातून भाविकांच्या भावनांशी खेळ होत आहे. त्याचबरोबर धर्मार्थ कामासाठी जमा होणाऱ्या निधीचा गैरवापर होतांना दिसतो, असा संशय अनेकांनी व्यक्त केला. त्यामुळे तो गरजू लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. या माध्यमातून श्री श्री रविशंकर यांच्या नावाचा सर्रास गैरवापर येथे होत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या प्रकरणात अवैधपणे पैसे वसूल करणे, या सदराखाली पोलिसांनी चौकशी करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात स्थानिक आयोजक कैलाश अग्रवाल व सुधीर इंगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देणगी प्रवेशिकेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाचा खर्च भागविण्यात येत असल्याची माहिती दिली, तसेच अशा प्रकारे अनधिकृत वसुली कशी काय सुरू आहे, यावर मात्र त्यांनी मौन बाळगले. या संदर्भात अधिक माहितीसाठी स्थानिक दीपक वोरा यांच्याशी संपर्क केला असता तो झाला नाही. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा