३३ कोटींचा प्रकल्प तयार
आनंदनगर, ज्युपीटर रुग्णालयाच्या निविदा तयार
जीन्यांऐवजी रॅम्पचे पुल
ठाणे शहराला दुभाजून जाणारा पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच झपाटय़ाने होणाऱ्या नागरीकरणामुळे चर्चेत आलेल्या घोडबंदर मार्गावर उड्डाणपुलांपाठोपाठ पादचारी पुलांचे मोठे जाळे उभारण्याच्या प्रक्रियेला अखेर वेग आला असून या दोन्ही मार्गावरील पादचाऱ्यांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आनंदनगरपासून कासारवडवलीपर्यंत तब्बल सहा ठिकाणी पादचारी पुल उभारण्याची तयारी सुरु केली आहे. या सर्व पादचारी पुलांचा नवा आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी सुमारे ३३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आनंदनगर तसेच ज्युपीटर रुग्णालय येथे पादचारी पुल उभारण्यात येणार असून या कामांची निवीदाप्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस नागरीकरणाचा वेग जबरदस्त असून पुर्व द्रुतगती महामार्गापलिकडे मोठय़ा प्रमाणावर नागरी वसाहती उभ्या राहू लागल्या आहेत. मुळ शहरात नव्या विकासाला एकीकडे मर्यादा आल्या असताना महामार्गापलिकडे तसेच घोडबंदर मार्गालगत होणारा नागरीकरणाचा वेगही मोठा आहे. नागरीकरणाच्या या वेगामुळे गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला असून रस्त्याच्या दुतर्फा ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने पुर्व द्रुतगती महामार्गावर तीनहात नाका, नीतीन कंपनी तसेच ज्युपीटर रुग्णालयाच्या अलिकडे तीन मोठे उड्डाणपुल उभारले आहे. महामार्ग ओलांडताना ठाणेकर प्रामुख्याने या मोठय़ा उड्डाणपुलाखाली असलेल्या सिग्नल यंत्रणांचा वापर अधिक करताना दिसतात. असे असले तरी महामार्गालगत मोठय़ा प्रमाणावर नागरी वस्ती असल्याने महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने मध्यंतरी यासंबंधी सर्वेषण केले असता दररोज शेकडोंच्या संख्येने पादचारी महामार्ग ओलांडतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे महामार्ग तसेच घोडबंदर मार्गावर नेमके कोणत्या ठिकाणी पादचारी पुल उभारता येतील, याचा सविस्तर अभ्यास अभियांत्रिकी विभागाने केला होता. यानुसार आनंदनगरपासून घोडबंदर मार्गावरील कासारवडवलीपर्यंत तब्बल सहा ठिकाणी पादचारी पुल उभारण्याचे नक्की करण्यात आले असून यासंबंधीची निवीदाप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
कोठे उभारणार पादचारी पुल ?
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आनंदनगर येथील श्री मॉ बाल निकेतन येथून करण्यात येणार असून या पुलासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांची निवीदा काढण्यात आली आहे. या पाठोपाठ ज्युपीटर रुग्णालयास लागूनच ९० मीटरचा लांबीचा पादचारी पुल उभारण्यात येणार असून त्यावर सहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांच्या उभारणीसाठी निवीदा काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ सुत्रांनी दिली. दरम्यान, घोडबंदर मार्गावर तत्वज्ञान विद्यापिठ, आर मॉल तसेच ब्रम्हांड नाका तसेच कासरवडवली अशा चार ठिकाणी पादचारी पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या पुलांसाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत धरण्यात आला आहे.
जीन्यांऐवजी रॅम्प
महामार्गावरील या पादचारी पुलांवर कोटय़वधी रुपयांचा खर्च करताना त्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी अभियांत्रिकी विभागाने जिन्यांऐवजी रॅम्प बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई तसेच ठाण्यातील काही भागांमध्ये उभारण्यात आलेल्या स्कॉयवॉकचा फारसा वापर होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे याठिकाणी पादचारी पुलांना जीने असू नयेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. रॅम्पच्या जोडीला काही पादचारी पुलांना लिफ्ट बसविल्या जाणार आहेत. आराखडे तयार करताना लिफ्टच्या खर्चाचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, महामार्गाना लागून असलेल्या सव्र्हिस रस्त्यांवरुन या पुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. हेत, असेही त्यांनी सांगितले.
ठाण्याच्या महामार्गावर पादचारी पुलाचे जाळे
३३ कोटींचा प्रकल्प तयार आनंदनगर, ज्युपीटर रुग्णालयाच्या निविदा तयार जीन्यांऐवजी रॅम्पचे पुल ठाणे शहराला दुभाजून जाणारा पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच झपाटय़ाने होणाऱ्या नागरीकरणामुळे चर्चेत आलेल्या घोडबंदर मार्गावर उड्डाणपुलांपाठोपाठ पादचारी पुलांचे मोठे जाळे उभारण्याच्या प्रक्रियेला अखेर वेग आला
First published on: 07-02-2013 at 02:01 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lots of foot path on thane roads