१५ दिवसांत फक्त १५ टक्के गाळ उपसला
गाळ टाकण्यासाठी जागेचा अभाव, कंत्राटदारांनी फिरविलेली पाठ, सत्ताधारी-विरोधकांनी घेतलेले आडमुठे धोरण आदी समस्यांवर मात करीत पालिका प्रशासनाने १५ दिवसांपूर्वी नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली खरी. परंतु हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून येत्या २४ दिवसांमध्ये नालेसफाईचे तब्बल ८५ टक्के काम पूर्ण करावे लागणार आहे. मात्र १५ दिवसांत अवघे १५ टक्केच नालेसफाई झाल्याने ‘मुंबई गाळात जाणार’ ही भीती वास्तवात येणार, अशीच चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून काढलेला गाळ आक्सा येथील क्षेपणभूमीत टाकण्यात येत होता. मात्र या क्षेपणभूमीची क्षमता संपल्यामुळे अखेरच्या टप्प्यात नाल्यांतून काढलेला गाळ टाकायचा कुठे, असा प्रश्न गेल्या वर्षीच निर्माण झाला होता. त्यामुळे यंदा कंत्राटदारांनीच नाल्यातील गाळाची विल्हेवाट लावावी, अशी अट निविदांमध्ये घालण्यात आली. परिणामी कंत्राटदारांनी नालेसफाईच्या कामाकडे पाठ फिरविली. वारंवार निविदा काढल्यानंतर ४६ कंत्राटदारांनी हे काम करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर क्षुल्लक कारणांवरून नालेसफाईच्या कामाचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये सत्ताधारी-विरोधी पक्षांच्या सदस्यांनी रोखून धरले. नालेसफाईच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर कंत्राटदारांना कार्यादेश देण्यातही विलंब झाला. त्यामुळे नालेसफाईची कामे नियोजित वेळेत सुरू होऊ शकली नाहीत.
पेण, उरण, घोडबंदर आदी ठिकाणच्या खासगी भूखंडावर गाळ टाकण्यास संबंधित मालकांनी परवानगी दिल्यामुळे कंत्राटदारांनीही सुटकेचा निश्वास टाकला आणि अखेर २९ एप्रिलपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईतील २१३.०७९ कि.मी. लांबीच्या मोठय़ा आणि १५६.५०४ कि.मी. लांबीच्या लहान नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम ६ जूनपर्यंत कंत्राटदारांना करावे लागणार आहे. परंतु गेल्या १५ दिवसांमध्ये कंत्राटदारांना अवघा टक्के गाळ काढला गेला आहे.
तब्बल ८५ टक्के गाळ अद्याप नाल्यांतच आहे. कामाची व्याप्ती आणि हातात असलेला कालावधी पाहता नालेसफाईचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे कंत्राटदार सांगत आहे. मात्र हे काम ६ जूनपर्यंत पूर्ण होईल असा विश्वास पालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत. मात्र ते हा विश्वास कशाच्या आधारे करीत आहेत, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

Story img Loader