डिसेंबर महिना मराठी नाटय़रसिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे. या एका महिन्यात तब्बल १५ ते २० नवीन नाटकांचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. मात्र पुढील वर्षांतल्या पुरस्कार सोहळ्याकडे नजर ठेवून डिसेंबरमध्ये ही नाटकांची माळ लागल्याची चर्चाही नाटय़सृष्टीत सुरू आहे.डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला रंगभूमीवर आलेल्या ‘तक्षकयाग’ या नाटकाद्वारे अविनाश नारकर यांनी पुनरागमन केले आहे. त्याशिवाय सतीश तारे यांचे ‘सगळं कसं गुपचुप’ हे नाटकही रंगभूमीवर दाखल झाले आहे. तर १२-१२-१२च्या मुहुर्तावर ‘इथं नाव ठेवायला जागाच नाही’ या ‘नावात काय आहे’ या एकांकिकेवर आधारित नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला.ही नाटके वगळता डिसेंबरच्या उत्तरार्धात अनेक नाटके आपला पहिला प्रयोग करणार आहेत. कारागृहाच्या पाश्र्वभूमीवर घडणारे कौटुंबिक व सामाजिक नाटक, या शब्दांत वर्णन केले गेलेले ‘श्री चिंतामणी’चे ‘मायलेकी’ १५ डिसेंबर रोजी रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहनी यांनी केले आहे. तर ट्रेनच्या डब्यात रंगणारे आणि विचित्र नातेसंबंधांची उकल करणारे ‘प्रपोझल’ हे कविता कोठारी निर्मित व राजन ताम्हाणे दिग्दर्शित नाटकही याच दरम्यान दाखल होणार आहे.त्याशिवाय दिग्दर्शक विजय केंकरे यांची ‘दुर्गाबाई, जरा जपून’ आणि ‘फॅमिली ड्रामा’ ही दोन नाटके एका पाठोपाठ आपापले शुभारंभाचे प्रयोग करणार आहेत. अशोक पाटोळे लिखित ‘दुर्गाबाई’चा शुभारंभाचा प्रयोग २५ डिसेंबर रोजी होणार असून अद्वैत दादरकर लिखित ‘ड्रामा’ २७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर चित्रपट दिग्दर्शनातून लोकांच्या परिचयाचे झालेले दिग्दर्शक शिरीष राणे आपले पहिले नाटक ‘लव्ह इन रिलेशन’ डिसेंबरमध्येच प्रदर्शित करणार आहेत. तसेच भद्रकाली प्रोडक्शनची ‘झोलबच्चन’ आणि ‘बेचकी’ ही दोन नाटकेही रंगभूमीवर आपला पहिला प्रयोग सादर करतील.पुढील वर्षी फेब्रुवारीपासून विविध पुरस्कार सोहळे सुरू होणार आहेत. यातील बहुतांश सोहळ्यांसाठी ‘डिसेंबपर्यंत नाटकाचा शुभारंभ झालेला असावा’, अशी अट असते. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी डिसेंबरचा मुहूर्त साधला असल्याची चर्चा रंगली आहे. अर्थात नाटय़रसिकांसाठी डिसेंबर महिना सुखाचा ठरणार आहे, हे नक्की!            
डिसेंबरमध्ये
रंगभूमीवर
१. मायलेकी
२. प्रपोझल
३. दुर्गाबाई, जरा जपून
४. फॅमिली ड्रामा
५. झोलबच्चन
६. बेचकी
७. टाइम प्लिज
८. लव्ह इन रिलेशन
९. फू बाई फू फुगडी फू
१०. तक्षकयाग
११. सगळं कसं गुपचुप
१२. इथे नाव ठेवायला जागा नाही
१३. बायको कमाल मेहुणी धमाल

‘मायलेकी’ देणार कारागृहाच्या
पाश्र्वभूमीवरील कौटुंबिक नाटय़ाचा अनुभव
नाटकांच्या नेहमीच्या चौकटीबाहेरच्या विषयांवरील नाटके सादर करून मराठी नाटय़रसिकांना आगळाच आनंद देणारी ‘श्री चिंतामणी’ ही संस्था आता तशाच पठडीतले आणखी एक नाटक रंगभूमीवर आणत आहे. या नाटकाचे वैशिष्टय़ म्हणजे हे नाटक कारागृहाच्या पाश्र्वभूमीवर घडणारे कौटुंबिक व सामाजिक नाटक आहे. हे नाटक वास्तवाच्या जवळ नेण्यासाठी ‘श्री चिंतामणी’च्या लता नार्वेकर, लेखक संजय कृष्णाजी पाटील, दिग्दर्शक कुमार सोहनी यांच्यासह सर्वच टीमने प्रचंड अभ्यास केला असून हे नाटक १५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.ही गोष्ट कोल्हापूरमधील तलाठी ज्ञानदेव सावंत यांची बायको शेवंता आणि तिची मुलगी माधवी यांची आहे. शेवंताक्काने माधवीला मोठय़ा कष्टाने वाढवले असून आता ती एका तुरुंगात तुरुंग अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. ती अत्यंत कर्तव्यकठोर आणि कणखर अशी अधीक्षक आहे. माधवी तुरुंगातील व्यवस्थेलाच आव्हान देते आणि प्रसंगी व्यवस्थेशी दोन हात करण्याची तयारीही ठेवते. शेवंताक्का आणि तिच्या दोन लेकी आपापल्या कुटुंबातील समस्यांना आणि व्यावसायिक समस्यांना कशा तोंड देतात, याचे चित्रण नाटकाद्वारे करण्यात आले आहे.