गेल्या आठवडय़ात झालेल्या संततधार पावसाने शहरातील बहुतेक ठिकाणचे रस्ते उखडले तर काही ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाण्याची डबकी साचली आहेत. खड्डय़ांमुळे नागपूरचे रस्ते अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. काही वर्षांपूर्वी नागपूर शहरातील रस्त्यांची स्थिती कशी होती आणि यंदा पावसाळ्याच्या प्रारंभी रस्त्यांची कसे हाल झाले आहेत, याकडे पाहिले तर शतकोत्तर महोत्सव साजरा होत असताना उपराजधानीचा दर्जा देण्यात आलेल्या नागपूरची खरी ओळख ती हीच का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येत आहे.  
शहरातील अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले असले शहरातील ८० टक्के भागात डांबरी रस्ते आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जात असली तरी पावसाळ्यात मात्र हे रस्ते उखडले जातात. गेल्या आठवडय़ातील पावसाने अनेक खड्डय़ांमध्ये टाकण्यात आलेली माती आणि रस्त्यांवरील डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे उघडे पडले आहेत. काही रस्त्यांवरून जाताना कच्च्या रस्त्यांप्रमाणे धूळ आणि माती साचलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि सार्वजानिक बांधकाम विभागाने आयआरडीपीतंर्गत करण्यात आलेल्या महामार्गावरची अवस्था फारच बिकट झाली आहे. मोक्षधाम स्मशानभूमीपासून उमरेड मार्गपर्यंत, भंडारा मार्ग, वर्धा मार्ग, कामठी मार्ग, काटोल मार्गावरील डांबरी रस्त्यावर काही ठिकाणी खाचा पडल्या आहेत तर काही ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरून वाहने चालवताना नागपूरकरांना कसरत करावी लागत आहे.
ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सने शहरातील अनेक वस्त्यामध्ये जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेले खड्डे अजूनही बुजविलेले नाहीत. परिणामी नागरिकांना या खड्डय़ांमुळे चिखल, माती आणि घाणेरडय़ा पाण्याचे शिंतोडे अंगावर झेलावे लागत आहेत असून लहान सहान अपघात नित्याची बाब झाली आहे. शहरातील अनधिकृत वस्त्त्यामधील रस्त्याची अवस्था तर फारच वाईट आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बघून आपण उपराजधानीत खरोखरीच राहत आहोत का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. रस्त्यांच्या दुर्दशेसाठी एकमेकांकडे बोट दाखण्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांची वृत्ती शहरवासीयांना अधिक संताप आणत आहे.

खड्डे बुजविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे मान्य केले. मात्र, पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी जेटपॅचद्वारे खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणच खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. ते बुजविण्यासाठी दहाही झोनमधील अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सने पाईप लाईन टाकण्यासाठी खोदलेले खड्डे बुजविले नसल्याच्या तक्रारी आहेत. ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आहे. ओसीडब्ल्यूने निर्धारित वेळेत शहरातील खड्डे बुजविण्याचे काम केले नाही तर महापालिका एजन्सीच्या मार्फत काम करून तेवढा पैसा ओसीडब्ल्यूकडून वसूल करणार आहे. त्यासाठी महापालिकेने गांधीबाग आणि हनुमाननगर या दोन झोनमध्ये एजन्सीजची नियुक्ती केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या शिवाय विद्युत विभाग, नासुप्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजानिक बांधकाम विभाग आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Story img Loader