पाऊस ओसरताच मुंबईतील खड्डय़ांचा पालिकेला विसर पडला आहे. मात्र त्याचवेळी खड्डे बुजविण्याचे नाटक वठवलेल्या कंत्राटदारांची बिले मंजूर करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी केली आहे. स्वाभाविकच कंत्राटदारावरील कारवाईची प्रशासनाची शिवसेनेची ‘डरकाळी’ हवेतच विरली आहे. विशेष म्हणजे कारवाईच्या कचाटय़ात अभियंते सापडू नयेत याची काळजी दस्तुरखुद्द प्रशासनेच घेतली आहे.
यंदा पावसात रस्ते खड्डय़ांत गेले होते. अजूनही बरेच रस्ते खड्डय़ांतच आहेत. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पालिकेने कंत्राटदार आणि अभियंत्यांना दम भरण्याचे नाटक करीत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले. अर्थातच त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि गणरायांना  ‘हलतडुलत’च यावे आणि जावेही लागले. जूनपासून आजवर पालिकेच्या संगणक प्रणालीवर ३८,५३५ खड्डय़ांची नोंद झाली. त्यापैकी ३७,२७० खड्डे बुजविण्यात आले असून १,२६५ खड्डे ‘जैसे थे’च आहेत. ही झाली अधिकृत नोंद. प्रत्यक्षात कंत्राटदारांनी बुजविलेले खड्डे पुन:पुन्हा उखडून रस्त्यांची चाळण होऊ लागली आहे. मात्र त्याकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्षच नाही.
पावसाळा ओसरू लागताच पालिका अधिकाऱ्यांना खड्डय़ांचा विसर पडला आणि मुंबईकरांच्याही खड्डे अंगवळणी पडले. पाठोपाठ ऑक्टोबर महिना उजाडताच कंत्राटदारांनी प्रशासनाकडे कामाची बिले सादर केली असून ती मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. खड्डे बुजविण्यात निष्काळजीपणा करणारे कंत्राटदार आणि कामात कुचराई करणाऱ्या अभियंत्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची घोषणा सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाने केली होती. मात्र कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या कामगिरीचे प्रगतिपुस्तक प्रशासनाने अडगळीत टाकले आहे. त्यामुळे मुंबईकरांना वेठीस धरणारे कंत्राटदार आणि अभियंत्यांविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता धूसर बनली आहे.गेल्या वर्षी दंड ठोठावताच आक्रमक झालेल्या अभियंत्यांनी प्रशासनाला दणका दिला होता. त्यामुळे यंदा प्रशासन ताकही फुंकूनच पित आहे. अभियंत्यांना कारवाईची भीती घालताना चांगले काम करणाऱ्याला दोन गुण, तर कामात कुचराई केल्यास एक गुण वजा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उदाहरणादाखल एखाद्या अभियंत्याने १० खड्डे काळजीपूर्वक भरले, तर त्याला २० गुण मिळतील आणि अन्य १० खड्डे भरण्यास विलंब झाल्यास त्याचे १० गुण वजा होतील. तरीही त्यांच्या खात्यावर १० गुण जमा राहतील अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तसेच एखाद्या अभियंत्यावर कारवाईची वेळ आलीच तर प्रत्येक खड्डय़ासाठी त्याच्याकडून अवघा ५० रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
रस्त्यांवर असंख्य खड्डे दिसत असताना गेल्या १५ दिवसांपासून पालिकेच्या संगणक प्रणालीवर येणाऱ्या खड्डय़ांच्या छायाचित्रांचा ओघ अचानक आटला आहे. आता दिवसाला केवळ १० ते १५ छायाचित्रे येत आहेत. खड्डे शोधून त्यांची छायाचित्रे संगणक प्रणालीवर पाठविण्याची जबाबदारी अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र पाऊस ओसरताच अभियंत्यांनीही रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader