* प्लॅटफॉर्म रामभरोसे!
* बदलत्या फलाटांमुळे प्रवासी संभ्रमात
* चुकीचे इंडिकेटर्स, चुकीच्या उद्घोषणांमुळे प्रवासी बेजार
शनिवारचा दिवस..कल्याण स्थानकात संध्याकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी..फलाट क्रमांक चारवर बदलापूरला जाणाऱ्या ७.१९ च्या गाडीचा इंडिकेटर्स लागल्यामुळे बदलापूरकर प्रवाशांची फलाटावर गर्दी..तर काहीजण पुढच्या कसारा गाडीची वाट पाहत होते..अनेक जण रेल्वे पूल आणि फलाटावर रेंगाळत होते.. मात्र त्याच वेळी प्लॅटफॉर्मवर बदलापूर गाडी ऐवजी ७.२५ वाजता सुटणारी कसारा गाडी दाखल झाल्याने अचानकपणे या फलाटावर गोंधळ उडाला. काहींची चेंगराचेंगरी झाली तर या गोंधळामुळे काहींना गाडी सोडून द्यावी लागली. या प्रसंगाने मोठा अपघात घडला नसला तरी कल्याण स्थानकात हल्ली असा सावळा गोंधळ नेहमीच सुरूअसतो. रेल्वेच्या या सततच्या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये रेल्वेविषयी संताप पसरला आहे.
उपनगरीय रेल्वेचे मुंबईच्या दुसऱ्या टोकाचे सर्वात शेवटचे मोठे स्थानक म्हणून कल्याण स्थानकांची ओळखअसून, स्थानकातून दिवसाला सुमारे साडेतीनशेहून अधिक लोकल, मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ा ये-जा करतात. कल्याण स्थानकातून देशभरात रेल्वे गाडय़ा सुटतात. त्यातून सुमारे दोन लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करत असून त्यांच्यामुळे रेल्वेच्या मासिक उत्पन्नात सुमारे १५ कोटी रुपयांची भर पडते. मध्य रेल्वेचे इतके महत्त्वाचे जंक्शन असलेल्या या स्थानकाच्या वेळापत्रकानुसार गाडय़ांचे प्लॅटफॉर्म ठरवण्यात अजूनही मोठय़ा अडचणी उद्भवतात. चुकीचे इंडिकेटर्स आणि उद्घोषणांमुळे प्रवाशांना मन:स्तापही सहन करावा लागतो.   
 फलाट क्रमांक १ आणि १ एवरून कल्याणहून मुंबईकडे गाडय़ा सुटतात. फलाट क्रमांक २, ४ आणि ५ वरून कसारा आणि कर्जतकडे, तर ३, ६ आणि ७ हे मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचे फलाट आहेत. मात्र अनेकदा ठरलेल्या फलाटाऐवजी ऐनवेळी  गाडी दुसऱ्याच फलाटावर आणून प्रवाशांची त्रेधातिरपीट उडविण्यात कल्याण स्थानक कमालीचे बदनाम आहे. फलाट क्रमांक दोनवर असलेल्या प्रवाशांना अचानक चार किंवा पाचवर जावे लागल्यास धावपळ करत रेल्वे पूल चढावा लागतो. अशा वेळी जेष्ठ नागरिक, महिलांना आणि मोठे ओझे घेतलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी काही प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडण्याचा पर्यायही स्वीकारतात.  
फलाट बदलण्याचे प्रमाणे कमी..
कल्याण स्थानकातील लोकल्स आणि मेल या दोन्ही गाडय़ांचे वेळापत्रक जपावे लागते. तसेच गाडय़ांचा खोळंबा होऊ नये यासाठी फलाट बदलणे गरजेचे असते. एकाच फलाटाच्या दुसऱ्या बाजूला गाडी आली तर लोकांना त्रास होत नाही. मात्र पूर्ण  फलाट बदलला तरच प्रवाशांना त्रास होतो. मात्र हे प्रमाण अत्यंत कमी असून दिवसभरात चार ते पाच वेळाच असे करावे लागते, अशी प्रतिक्रिया कल्याण रेल्वे स्थानक व्यवस्थापक ओ. पी. करोटिया यांनी ‘वृत्तान्तह्णशी बोलताना दिली.
रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा
रेल्वे प्रशासनामध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे हे प्रकार घडत असून त्यामध्ये सुधारणा करण्याऐवजी रेल्वे याकडे दुर्लक्षच करत आहे. रेल्वेचा हा हलगर्जीपणा असून त्यामुळे प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने वेळीच हे प्रकार न रोखल्यास प्रवाशांना तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी दिली आहे. 

Story img Loader