शहर पोलीस आयुक्त कार्यालय, शहर वाहतूक विभाग यांच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’अंतर्गत विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली असून १५ जानेवारीपर्यंत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ही राबविण्यात येणार आहे.
वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त एस. आर. ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी महामार्ग बस स्थानकासमोरील रिक्षा, टॅक्सी स्टॅण्ड येथील ७५ चालकांचे वाहतूक नियमांविषयी प्रबोधन करण्यात आले. यानंतर पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयात ‘विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीचे नियम’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. सिडको येथील सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयाच्या वतीने वाहतूक नियमांच्या प्रबोधनासाठी त्रिमूर्ती चौक, पाटील नगर, पवन नगर परिसरातून फेरी काढण्यात आली. दरम्यान, जिल्हा सुरक्षितता समिती, प्रादेशिक परिवहन कार्यालय, महामार्ग पोलीस, शहर वाहतूक शाखा, ग्रामीण पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षा तसेच अपघात टाळण्यासाठी उपाययोजना व समस्यांचे गांभीर्य याबाबत जनताभिमुख उपक्रमांना सुरुवात करण्यात आली.
त्याअंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय व बालाजी मोटर ड्रायव्िंहग स्कूल यांच्या वतीने पिंपळगाव बसवंत येथे वाहनांना रिफ्लेक्टर लावणे तसेच वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष पेडामकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुमंत पाटील उपस्थित होते.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात परवाना काढण्यासाठी आलेल्या सुमारे ६० अर्जदारांना रस्ता सुरक्षाविषयी संगणकावर माहिती दाखविण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत लेन कटिंग, नो पार्किंग यांविषयी तपासणी मोहीम राबविण्यात आली. सीबीएस येथेही फिरते रस्ता सुरक्षा प्रदर्शन दाखविण्यात आले.