स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२२ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी फुले पेठेतील समता भूमीतील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले.
 महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुणे विद्यापीठास महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बाळासाहेब जानराव, संजय सोनावणे यांनी केली. पुणे नगर वाचन मंदिर येथे संस्थेचे अध्यक्ष माधव सोमण यांनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेला हार अर्पण केला तर केतजकुमार पाटील, शंकर दामोदरे यांनी मनोगत व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली. भीमछावा संघटनेने तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा एक वेगळा संकल्प केला.
फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशनच्या कोथरुड शाखेच्या वतीने शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी भव्य मिरवणूक काढून महात्मा फुलेंना अभिवादन केले. या मिरवणुकीत १० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयातर्फे तसेच अण्णा भाऊ साठे स्मारक संस्थेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने योगेश चव्हाण, सुजित रणदिवे यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्याला हार अपर्ण केला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दलित विकास आघाडीच्या वतीनेही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा