कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बुधवारी कुसुमाग्रज प्रतिष्ठानसह विविध संस्था, ग्रंथालय, शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये यांच्यातर्फे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सायंकाळी सहा वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षांआड दिला जाणारा जनस्थान पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना ज्येष्ठ साहित्यिक तथा रंगकर्मी डॉ. गिरीश कर्नाड यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.
जागतिक मराठी दिनानिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने बुधवारी सकाळी साडे पाच वाजता ‘कुसुमाग्रज पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध सतारवादक डॉ. उद्धव अष्टुरकर यांचे सतारवादन आणि पंडित विजय कोपरकर यांच्या गायनाचा हा कार्यक्रम आहे. गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात हा कार्यक्रम होईल. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पेटी वाचनालयाचा आदिवासी विभागातील शुभारंभ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव व खरवळ या गावी बुधवारी दहा वाजता होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजिलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वनाधिपती विनायकदादा पाटील भूषविणार आहेत. प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्काराचे वितरण या दिवशी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये होणाऱ्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल असतील. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांसाठी हे कार्यक्रम खुले आहेत. रसिकांनी कार्यक्रमांस उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त मनसेच्यावतीने प्रभाग क्रमांक ४० मध्ये अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे उद्घाटन आ. वसंत गिते यांच्या हस्ते होणार आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत ग्रंथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्व पुस्तकांवर सवलत दिली जाणार आहे. तसेच बुधवारी नऊ वारी साडी परिधान करण्याची स्पर्धा चार वयोगटात होईल. गुरूवारी दुपारी तीन वाजता भजन स्पर्धा होणार असून त्यात प्रत्येक मंडळास १० ते १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. १ व २ मार्च रोजी मराठी पदार्थाचा खाद्य महोत्सव व घरगुती पदार्थाची विक्री या उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. इंदिरानगर येथील अजय मित्र मंडळाच्या सभागृहात हे उपक्रम होणार असून नागरिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजक नगरसेवक यशवंत निकुळे व नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केले आहे.
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनतर्फे बुधवारी दुपारी दोन वाजता ‘कुसुमाग्रज साहित्य दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज यांची निवडक लोकप्रिय गाणी, निवडक नाटय़प्रवेश, कथा व निवडक कवितांचे सादरीकरण या कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. कवी किशोर पाठक, सदानंद जोशी, हेमा जोशी, शुभांजली पाडेकर, कन्याकुमारी गुणे यांच्या सादरीकरणाला नवीन तांबट तबल्यावर तर रागेश्री धुमाळ हार्मोनियमवर साथ संगत करणार आहेत. विद्यापीठाच्या ऑडीटोरियममध्ये हा कार्यक्रम होईल. तसेच मुक्त विद्यापीठाच्यावतीने कुसुमाग्रज स्मारक वाचनालय, कवी नारायण सुर्वे वाचनालय आणि पंचवटी वाचनालयास कथासंग्रह व कविता संग्रह भेट देण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा