गोंदिया जिल्ह्य़ात शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जोरदार पावसाने गोंदिया, आमगाव, गोरेगाव, तिरोडा तालुक्यांना चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे अनेक रस्ते पुलावरून पाणी जात असल्याने बंद झाले असून गावागावातीलच नव्हे, तर रजेगाव येथील बाघ नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने गोंदिया-बालाघाट हा महाराष्ट्र-मध्यप्रदेश महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे अनेक वाहनांची मोठी रांग रस्त्याच्या दोन्ही कडेला लागली होती. कालीसरार धरणातूनी पाणी सोडल्यामुळेही जिल्ह्य़ातल्या नद्या फुगल्या आहेत.
या पावसामुळे नदी-नाल्यांच्या किनाऱ्यावरील अनेक घरे जलमय झाली असून गोंदिया व आमगाव शहर व ग्रामीण भागातील अनेक घरात पाणी शिरल्याने लोकांना  त्रास सहन करावा लागला. आमगाव येथील बनगाव भागात गणेशटोली परिसरातील २५० पुरात अडकलेल्या लोकांना पूर नियंत्रण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित स्थळी हलविले. येथील गोिवदा शिवणकर यांचा गोठा पडल्याने २ म्हशी मरण पावल्या. गोंदिया तालुक्यातील कामठा परिसरात शेतात गेलेले ५ लोक पुराच्या पाण्यात अडकल्याने प्राण वाचविण्याकरिता झाडावर चढले होते. या सर्वानाही पूर नियंत्रण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले. यात मनोहर लिल्हारे, उमाशंकर लिल्हारे, दिनेश मस्करे, दिनेश लिल्हारे, महेंद्र चौधरी यांचा समावेश होता. अनेक मार्ग बंद झाले. यात खमारी पुलावर पाणी वाढल्याने गोंदिया-आमगाव-देवरी मार्ग, सिंधीटोला गावातील नाल्यात पाणी वाढल्याने गोंदिया-गिरोला-घाट टेमणी मार्ग, गिरोला येथील नाल्यात पूर आल्याने गोंदिया-दासगाव-किन्ही, चुटीया मार्गावरील रपटे वाहून गेल्याने गोंदिया-चुटीया मार्ग, मोहाडी नाल्यात पूर आल्याने गोंदिया-गोरेगाव-िलबा आदी मार्ग बंद झाले होते. अंभोरा तलावाची सुरक्षा िभत पडल्यामुळे गोंदिया-रावणवाडी मार्ग बंद झाला होता. तसेच अनेक घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्य़ातील ३०० घरांची पडझड होऊन ६ घरे पूर्णत: कोसळली आहेत. गोरेगाव तालुक्यात ५, तर तिरोडा येथे १ घर पडल्याची माहिती आहे. गेल्या २४ तासात ११४६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असून त्यामुळे जिल्ह्य़ातील धरणे व नदी-नाले ओसंडून वाहत असून पुजारीटोला धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले. गोंदियातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील अनेक वॉर्डात पाणी शिरल्याने अनेक रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झलके, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे आदींनी शहरातील व ग्रामीण भागातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला.
वैनगंगा फुगली, गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडले
वार्ताहर, भंडारा
चार दिवसांपासूनचा पाऊस व पुजारीटोला धरणातून सोडलेले १.३८५ क्युसेस पाणी, तसेच दुथडी भरून वाहणारे नदी-नाल्यांमुळे वैनगंगा नदीची पातळी वाढली असून ती ४.७६ मीटरवरून वाहत आहे. पुराची शक्यता लक्षात घेऊन गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आहेत. या धरणातून प्रती सेकंद ९३ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. दररोज पाऊस हजेरी लावत आहे. तलाव-बोडय़ा भरल्या आहेत. रोवणीला वेग आला आहे. महिला मजुरांची कमतरता भासत असून त्यांची मजुरी १५० ते१७० रुपयांपर्यंत गेली आहे.