प्रकाश, लखलखाट, तेज आणि आनंद, यांचा मिलाफ असलेल्या दीपावलीच्या आगमनाच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठ गर्दीने फुलून गेल्याचे दृश्य नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र दिसत होते. शनिवारी ‘वसूबारस’ने दीपावलीला सुरूवात होणार असल्याने विविध वस्तू खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. एरवी महागाईच्या नावाने शंख करणाऱ्यांनी गृहोपयोगी वस्तू, फ्लॅट खरेदी-विक्री, दागिन्यांची खरेदी याकडे कल ठेवला.
यंदाच्या दिवाळीवर मंदीचे सावट असल्याचे मानले जात होते. परंतु खरेदीवर याचा कुठलाही परिणाम झाला नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दीपोत्सवाची रंगत अधिकच खुलवणाऱ्या रांगोळीचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. सध्या होलसेलमध्ये १४० रुपयांना रांगोळीची गोण विकली जात आहे. तर किरकोळमध्ये पांढऱ्या रांगोळीचा दर १० रुपये किलो आहे. पांढऱ्या रांगोळीपेक्षा इतर रंगांतील रांगोळ्या पाच रुपयास ५० ग्रॅम अशा दराने उपलब्ध आहेत. यंदा बाजारात रेशीम रंग उपलब्ध झाले आहेत. कापसाच्या सहाय्याने हे रंग रांगोळीत भरले जातात. याची किंमत इतर रांगोळीपेक्षा महाग असून दोन रूपये तोळा या दराने त्याची विक्री होत आहे. याशिवाय प्लायवूड रांगोळी, रांगोळीचे विविध ठसे बाजारात उपलब्ध आहेत. सध्या संस्कार भारतीच्या रांगोळ्यांचे प्रस्थ वाढत असल्याने विविध प्रकारचे रांगोळी पेन २० ते ४५ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
दिवाळीचा गोडवा अधिक वाढावा तसेच स्नेहीजनांना शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक ‘गिफ्ट’ उपल्बध झाले आहेत. विविध प्रकारच्या भेटवस्तूंनी बाजारपेठ सजली असून त्यात पारंपरिक फराळापासून सुका मेवा, चॉकलेट यांचा समावेश आहे. यासह रेडिमेड फराळाची विविध पाकिटे २०० रुपयांपासून पुढील दरात उपलब्ध आहेत. ज्यांना रेडिमेड फराळ नको, त्यांनी आचाऱ्याला बोलावून फराळ तयार करण्याकडे कल ठेवला आहे.
साधारपणे अशा प्रकारे फराळ तयार करण्यासाठी ५० रुपये किलो, याप्रमाणे मजुरी दिली जात आहे. यातही गॅसचे वाढलेले भाव पाहता आचाऱ्यांनी ग्राहकांला तुमचा गॅस नसेल तर जादा रक्कम मोजावी लागेल असा इशारा दिला आहे. नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव या शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे पोलिसांना वाहतुकीचे विशेष नियोजन करावे लागत आहे. सायंकाळच्या वेळी काही ठिकाणी बाजारपेठांमधील रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा