० लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत वादाचा नागरिकांना फटका
० मुख्य रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण

कुरघोडीच्या राजकारणात घोडेबाजाराने मिळविलेली सत्ता टिकविण्याच्या नादात अंबरनाथमधील नागरी सुविधांकडे लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केले असून त्याचा त्रास मात्र शहरवासीयांना भोगावा लागत आहे. सध्या पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून खड्डय़ांतून वाट काढणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. विशेषत: वडवली वेल्फेअर सेंटर ते कैलासनगर या रस्त्याची वाताहात झाली असून लोकप्रतिनिधी मात्र कंत्राटदाराकडे बोट दाखवून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरातील काही दक्ष नागरिकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार वडवली रस्त्यावर लहान-मोठे तब्बल ५६ खड्डे आहेत.
वेल्फेअर सेंटर ते लोकनगरी पूल रस्ता काँक्रिटीकरणाचे काम एव्हाना पूर्ण व्हायला हवे होते. लोकनगरी पुलापासून या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली, मात्र पुढे रस्ता रुंदीकरणात आड येणारी अतिक्रमणे तोडण्यात बराच वेळ वाया गेला. अखेर तडजोड होऊन ४ एप्रिल रोजी अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यानंतर आता दोन महिने होऊन गेले तरी या रस्त्याचे काम इंचभरही पुढे सरकलेले नाही. उलट तोडण्यात आलेल्या बांधकामांचे डेब्रिज गटारांमध्ये पडल्याने सध्या रस्त्यांवर ठिकठिकाणी तळी साचली आहेत. सखल भागातील काही इमारतींमध्ये पाणीही शिरू लागले आहे. पालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष यासंदर्भात कंत्राटदाराकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असले तरी मनसे आणि शिवसेना या दोन पक्षातील अंतर्गत वादाची ही परिणती असल्याचे बोलले जाते. वडवलीचा हा मार्ग मनसेच्या नगरसेवकांच्या प्रभागांमधून जातो. त्यामुळे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी कंत्राटदाराचे बिल रखडवले, असा आरोप मनसेच्या गोटातून केला जात आहे. नगराध्यक्षांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, एक महिन्यापूर्वी कंत्राटदारास ८० लाखांपैकी ४० लाख रुपये देण्यात आले. रस्त्यावरील खड्डे भरल्यानंतर उर्वरित पैसे देण्यात येतील, असे सांगितले होते. कंत्राटदाराने खड्डे भरले नसल्याने त्याचे बिल देण्यात आलेले नाही.   
या रस्त्याशिवाय शिवाजी चौकातील वाहनतळाचे काम मोठा खड्डा खणल्यानंतर बंद पडले आहे. चौकातून वेल्फेअर सेंटरचा रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. आधीच अरुंद असलेला हा रस्ता अर्धा अधिक खोदून ठेवल्याने त्यातून मार्ग काढणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. पालिकेतील कुरघोडीच्या राजकारणाचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील चौधरी असले तरी उर्वरित विषय समित्या विरोधकांकडे आहेत आणि सत्तेच्या या साठमारीत शहरवासी भरडले जात आहेत.

Story img Loader