जिल्ह्य़ात दुष्काळी स्थितीमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत. परंतु याच वेळी राष्ट्रीय नेते लोकसभा उमेदवारीची चर्चा करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी च्िंाता करण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमरसिह पंडित यानी खासदार गोपीनाथ मुंडे यांना लगावला.
गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे ५० लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा प्रारंभ आमदार पंडित यांच्या हस्ते झाला.
राष्ट्रवादीला आपल्या विरोधात जिल्हय़ात तगडा उमेदवार सापडत नाही. त्यांना तो बारामतीहून आणावा लागेल, असे वक्तव्य मुंडे यांनी अलीकडेच केले. या वक्तव्याचा समाचार घेताना पंडित म्हणाले की, काही दिवसांपूर्वी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बीड जिल्हय़ातील पक्षाच्या नेत्यांबरोबर दुष्काळी स्थितीवर चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. निवडणुकीबाबत चर्चाही झाली नाही. इकडे मात्र राष्ट्रीय नेते स्वत:हून निवडणुकीचीच चर्चा करीत आहेत. राष्ट्रवादीकडे जिल्हय़ातच अनेक सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाच्या उमेदवाराची काळजी करू नका. दुष्काळात जनतेला मदत करण्याचे, मार्ग काढण्याचे दायित्व आपले नाही का, असा सवालही पंडित यांनी केला.
तालुक्यात लवकरच चार ठिकाणी जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader