विविध मागण्यांबाबत राज्यातील सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी भाजपच्या वतीने नागपूर येथे विधिमंडळास ११ डिसेंबर रोजी घेराव घालण्यात येणार आहे. त्यात जळगाव जिल्ह्य़ातून २५ हजार, तर नाशिकमधूनही हजारो कार्यकर्ते सहभाग घेणार असल्याची माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परकीय गुंतवणूक, सिंचन घोटाळा, राज्यातील विजेचे वाढते दर, डिसेंबपर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याची सरकारची घोषणा व कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा, आदी मागण्यांबाबत सरकारला जाब विचारला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. भाजपच्या या आंदोलनासंदर्भात जनजागृती व्हावी म्हणून गावागावात बैठका घेण्यात येत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी सांगितले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री एम. के. अण्णा पाटील, माजी खासदार वाय. जी. महाजन या वेळी उपस्थित होते.
नाशिक येथील बैठकीतही गुरुनाथ कुलकर्णी यांनी जिल्ह्यातून अधिकाधिक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. या बैठकीस जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर, माजी महापौर बाळासाहेब सानप, सीमा हिरे, संभाजी मोरूस्कर, सुहास फरांदे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा