सरत्या वर्षांला निरोप व नवीन वर्षांचे स्वागत साईंच्या दर्शनाने करण्यासाठी लाखो भाविकांनी शिर्डीत हजेरी लावली. केंद्रिय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह अनेक व्हीआयपींनीही आज येथे येऊन हा मुहूर्त साधला.
नववर्षांचे स्वागत साईबाबांच्या दर्शनाने व्हावे, अशी लाखो भक्तांची इच्छा असते. त्यामुळे राज्यभरातून पायी दिंडय़ा, साईबाबांच्या पालख्या वाजत-गाजत, मिरवणुकीने साईनामाचा जयघोष करत प्रचंड उत्साहात भाविकांनी शिर्डीत हजेरी लावली. नववर्षांनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली होती. बाबांच्या मूर्तीवर विविध अलंकार चढविण्यात आल्याने सुरेख रूप भक्तांना पाहायला मिळाले. ३१ डिसेंबरला मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले असल्याने अनेकांनी रात्री १२ नंतर दर्शनास पसंती दिली.
आज सकाळी शिर्डीत भक्तांचा महासागर लोटला होता. पिंपळवाडी रस्त्याने दोन किमीपर्यंत दर्शनरांग गेली होती. गेल्या आठ दिवसांपासून गर्दीत अशीच वाढ होत असून संस्थानच्या प्रसादालयात रोज ५० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. संस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. संभाव्य गर्दी लक्षात घेता अतिरिक्त भोजनव्यवस्था व तात्पुरती निवासव्यवस्था करण्यात आली होती. प्रसादलाडू विक्रीही रात्रभर खुली होती. व्हीआयपी पास बंद असल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
शिर्डीतून जाणारी अवजड वाहतूक बंद असतानाही गर्दीमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले. तात्पुरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने महिला भाविकांची कुचंबना झाली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त असतानाही चोर हात साफ करत होते. पायाभूत सुविधा व करमणुकीची व्यवस्था नसल्याने भक्तांचा हिरमोड झाला.