रोमिला थापर, जवाहरलाल नेहरू यांच्या भारताचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांना सध्या जर कुणाची स्पर्धा असेल तर ती आहे व्हॉट्सअपची. कारण, व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या इतिहास लिहिणाऱ्यांचा सुकाळ झाला आहे. गंमत म्हणजे या लघुइतिहास संदेशांच्या लेखकांना संदर्भ देण्याचीही गरज भासत नाही. त्यामुळे, गौतम बुद्धापासून हिटलर, माओ, राहुल गांधी, नरेंद्र मोदी अशा कुणाच्याही इतिहासाला हात घालण्याची करामत हे इतिहास लेखक करीत आहेत.
ऐतिहासिक घटनांची वाट्टेल तशी तोडमोड करणारे हे संदेश लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले जात आहेत हे उघड आहे. त्याला एखाद्या विशिष्ट पक्षाच्या विचारसरणीचा वास तर आहेच; पण, गंभीर बाब म्हणजे हे बहुतांश संदेश वाचणाऱ्याची माथी सटकवणारे आहेत. हे संदेश वाचून कुणी कुणाच्या पारडय़ात मते टाको वा न टाको. पण, डोक्यात दगड टाकण्यास नक्कीच लावतील अशी त्यांची जहाल भाषा आहे. सध्यातरी भावना भडकावणाऱ्या या संदेशांची दखल ना पोलिसांचा सायबर सेल घेतो आहे ना निवडणूक आयोग. त्यामुळे या संदेशांची देवाणघेवाण खुलेआमपणे होते आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे इतिहासाचे ज्ञान कसे कच्चे आहे याची खमंग चर्चा व्हॉट्सअपवर रंगली होती. पण, मोदीच नव्हे तर व्हॉट्सअपवर हे लघुइतिहास संदेश लिहिणाऱ्यांच्या इतिहासाच्या ज्ञानालाही भगदाडे पडली आहेत. उदाहरणार्थ व्हॉट्सअपवरचा एक संदेश १३७८ ते १९७१ पर्यंत भारताचे कसे वेगवेगळे तुकडे होऊन इस्लाम राष्ट्रे तयार झाले याचे कवित्त्व करतो. हा संदेश थोडक्यात असा..
१३७८ में भारत से एक हिस्सा अलग हुआ, इस्लाम राष्ट्र बना – नाम है इराण
१७६१ में भारत से एक हिस्सा अलग हुआ, इस्लाम राष्ट्र बना – नाम है अफगाणिस्तान
१४व्या शतकापासून सुरू झालेला इतिहासाच्या तोडफोडीचा हा किस्सा १९७१मध्ये बांगलादेशाच्या फाळणीपर्यंत रंगतो. हाच संदेश पुढे भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि अभिनेत्री गौहर खान यांनी आरती घेऊन दुर्गापूजा करण्यास नकार देण्याच्या घटनांचा दाखला देतो. मुस्लिम धर्म कर्मकांडे मानत नाही. हिंदू धर्मातही कर्मकाडांना दूर लोटण्याच्या गोष्टी होत असताना त्याचे स्तोम माजविण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींच्या कृत्याला पाठिंबा द्यायचा की त्यांना टीकेचे लक्ष्य करायचे, असा प्रश्न पडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजून तक्रार नाही
या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नीला सत्यनारायण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याकडे अजून तरी या संदर्भात कुणीही तक्रार केली नसल्याचे सांगितले. असे संदेशही आपल्या पाहण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. हे संदेश भावना भडकावणारे असले तरी व्हॉट्सअपवर संदेश तयार करणाऱ्या व्यक्तींचा धांडोळा आम्ही कसा घेणार, असा सवाल त्यांनी केला.
देवाणघेवण रोखणे शक्य नाही, पण..
पोलिसांच्या सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक मुकुंद पवार यांनी या संदेशांची देवाणघेवाण रोखणे पोलिसांच्या हातात नाही, असे स्पष्ट केले. मात्र, या संदेशांच्या बाबत कुणी तक्रार केल्यास आम्ही निश्चितपणे कारवाई करू. मात्र, त्यासाठी हे संदेश भावना भडकावणारे किंवा कुणाची बदनामी करणारे असल्याचे सिद्ध व्हायला हवे. तरच आम्हाला त्या विरोधात कारवाई करता येणे शक्य आहे, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांच्या कारवाईची प्रक्रिया स्पष्ट केली.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lots of wrong historical massages on whatsapp
Show comments