डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास इंदू मिलची जागा देण्याच्या निर्णयामुळे आंबेडकरी जनतेत उत्साहाचे वातावरण होते. महापरिनिर्वाणदिनी जिल्ह्य़ातील पानगाव येथे आंबेडकरांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी व त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता.
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे आंबेडकरांच्या अस्थी आहेत. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या अस्थींचे दर्शन घेऊन स्मृतीला अभिवादन करण्यासाठी परिसरातील हजारो आंबेडकरीप्रेमी उपस्थित राहतात. पहाटेपासून रांगा लावून दर्शन घेतले जाते. दुपारी अभिवादन सभेचे आयोजन केले जाते, तर सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम होतो.
लातूर शहरातील टाऊन हॉलच्या मैदानावरील आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच आंबेडकरी जनतेने रांगा लावल्या होत्या. सकाळी साडेदहाच्या सुमारास सामूहिक बुद्धवंदना झाली. मोहन माने, रघुनाथ बनसोडे, महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, स्थायी समितीचे सभापती अ‍ॅड. समद पटेल यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते महामानवास अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. सकाळपासून लागलेली रीघ दिवसभर हटत नव्हती. टाऊन हॉलच्या मैदानावर फुलांचा खच पडला होता.
ँडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी परभणीत आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, माजी आमदार सुरेश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप डोईफोडे, संबोधी अकादमीचे भीमराव हत्तीअंबिरे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, नगरसेवक डॉ. विवेक नावंदर, आकाश लहाने, विजय वाकोडे आदींनी डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
संबोधी मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. वानखेडे यांच्या हस्ते झाले. आमदार संजय जाधव, महापालिका आयुक्त सुधीर शंभरकर, समाजकल्याण आयुक्त उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.    

Story img Loader