भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथील एका विवाह समारंभात माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांना भाजपमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. डॉ. देशमुख यांनी मात्र ही शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळून लावली.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहून नितीन गडकरी बुधवारी सायंकाळी थेट अमरावतीत पोहोचले. आप्तेष्टांकडील विवाह समारंभाला उपस्थित राहून ते रात्री उशिरा बंधन लॉन येथे आयोजित डॉ. सुनील देशमुख यांचे ज्येष्ठ बंधू प्रतापराव देशमुख यांचे पुत्र अंगद यांच्या विवाह स्वागत समारंभात सहभागी झाले होते. नवदाम्पत्याला आशीर्वाद दिल्यानंतर नितीन गडकरी, डॉ. सुनील देशमुख, तसेच निकटच्या मित्रमंडळींशी संवाद रंगला. गप्पांच्या ओघातच ‘डॉक्टर, काँग्रेसमध्ये तुमचे भविष्य नाही. अजूनही विचार करा, भाजपमध्ये या’ असा थेट सल्ला गडकरींनी डॉ. देशमुखांना दिल्यानंतर सर्व जण अवाक् झाले.
डॉ. सुनील देशमुख यांनी त्यावेळी हा विषय हसण्यावारी नेला, पण त्यानंतर उपस्थितांमध्ये या निमंत्रणाची चर्चा रंगत गेली. डॉ. सुनील देशमुख यांनी जनविकास काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव हिंगासपुरे यांची नितीन गडकरींशी ओळख करून दिली. त्यानंतर लगेच गडकरी म्हणाले, ‘जोपर्यंत तुम्ही काँग्रेस हा शब्द वेगळा काढणार नाही, तोपर्यंत तुमचे भवितव्य नाही. ज्यावेळी तुम्हाला काँग्रेसची उमेदवारी नाकारण्यात आली, तेव्हा प्रणव मुखर्जीना आपण एकदा भेटलो असताना विदर्भाच्या चांगल्या कार्यकर्त्यांवर तुम्ही अन्याय करीत आहात, असे स्पष्टपणे सांगितले होते. प्रणव मुखर्जीनीही त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपतींच्या हट्टाचा उल्लेख करीत हतबलता व्यक्त केली होती, पण डॉक्टर तुम्ही तुमच्या करिअरची चिंता करू नका. भाजपमध्ये या तुमचे स्वागतच आहे.’
डॉ. सुनील देशमुख यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, नितीन गडकरी यांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी आपल्याला निमंत्रण दिले आहे, हे खरे आहे, पण हा विषय सहजपणे घेण्याचा आहे. तशी कोणतीही शक्यता नाही. या निमंत्रणाची चर्चा स्वागत समारंभात चांगलीच रंगली. राजकीय वर्तुळात गुरुवारी या विषयावर मंथन सुरू झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना संधी दिली त्यावेळी डॉ. सुनील देशमुख यांनी बंड केले होते. त्यानंतर त्यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केले होते. काँग्रेसने अनेक बंडखोरांना स्वगृही परत आणले आहे, पण केवळ डॉ. सुनील देशमुख यांचा केवळ अपवाद आहे. गेल्या तीन वर्षांपासून डॉ. सुनील देशमुख पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत, पण त्यांना तूर्तास कोणतीही दिलासा मिळालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा