सोळावे वरीस धोक्याचे..असे म्हटले जाते. कारण, या वयात कळत-नकळत मुलीचे पाऊल चुकीच्या दिशेने पडले तर त्याच्या परिणामांच्या वेदनांचे चटके तिला आणि तिच्या कुटुंबाला आयुष्यभर सोसावे लागतात. काही वेळेस या वेदना इतक्या असह्य़ होतात की त्यातून कुटुंबाला सावरणे कठीण होते आणि तिचे संपूर्ण कुटुंब भीतीच्या छत्रछायेखाली वावरते आणि चिंताग्रस्त होते. मीरा रोडमधील एका गुजराती कुटुंबामध्येही दोन महिन्यांपूर्वी असाच काहीसा प्रकार घडला आहे. प्रेम..धोका..अन् अॅसिड हल्ला..असा काहीसा प्रकार या कुटुंबातील मोठय़ा मुलीच्या बाबतीत घडला आहे. या घटनेत चेहरा विद्रूप झाल्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून त्यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. त्या तरुणाच्या विकृतीची शिक्षा हे कुटुंब आजही निमूटपणे भोगत आहे.
मीरा रोड (पूर्व) भागातील एका गृहसंकुलामध्ये एक गुजराती कुटुंब राहते. पती, पत्नी, दोन मुली असे हे छोटे कुटुंब आहे. या कुटुंबातील मोठी मुलगी २२ वर्षीय असून तिने वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. एमबीएचे शिक्षण घेऊन करिअर करायचे होते. त्यासाठी तिने एमबीएची पूर्वपरीक्षा नुकतीच दिली होती. तिची लहान बहीण दहावीत शिकते. तिचे वडील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक तर आई गृहिणी आहे. २००९ मध्ये मुंबईतील एका हुक्का पार्लरमध्ये मोठय़ा मुलीची ओळख अक्षय चंद्रेश शहा याच्यासोबत झाली होती. त्यातून त्यांची मैत्री झाली आणि त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. त्या वेळी त्याने मोक्ष या नावाने ओळख करून दिली होती. काही महिन्यांनंतर या दोघांच्या प्रेमसंबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यामुळे तो तिच्या कुटुंबीयांना भेटला होता. त्यातूनच त्याची त्यांच्या घरी ये-जा वाढली. याचदरम्यान त्याने लग्नाची बतावणी करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अधूनमधून त्याचे असे प्रकार सुरू होते. लग्नाची बोलणी करण्यासाठी कुटुंबाची भेट घालून देण्याचा तगादा तिच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडे लावला. मात्र, बतावण्या करून तो टाळाटाळ करू लागला. एके दिवशी त्यांना अक्षयच्या वडिलांचा मोबाइल क्रमांक मिळाला. या क्रमांकावर संपर्क साधताच, तिचे कुटुंबीय चक्रावले आणि त्यांना मोठा धक्काच बसला. अक्षय विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी अक्षयशी संबंध तोडले होते. त्यानंतरही त्याने पत्नीला सोठचिठ्ठी देणार असल्याचे सांगत तिला पुन्हा प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच दोघेही एकमेकांना लपूनछपून भेटत होते. याविषयी तिच्या कुटुंबाला काहीच माहीत नव्हते. दोन ते अडीच वर्षे उलटूनही पत्नीसोबत सोठचिठ्ठी घेत नसल्यामुळे तिने त्याला प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. मात्र, त्याने तिच्याकडे दोन महिन्यांची मुदत मागितली. पण, ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. ‘सोठचिठ्ठी घेत नाही, तोपर्यंत भेटू नकोस,’ असे सांगून ती निघून गेली. तिला एके दिवशी भेटण्यासाठी बोलाविले आणि एका भाडोत्री गुंडांमार्फत तिच्यावर अॅसिड हल्ला केला. या प्रकरणी मीरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या विकृत प्रियकराला आणि त्या गुंडाला अटक केली आहे. दोन महिन्यांपासून दोघेही कारागृहात बंदिस्त आहेत. मात्र, या घटनेमुळे तिचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले असून तिचा संपूर्ण चेहरा विद्रूप झाला आहे. या घटनेचा तिच्या लहान बहिणीच्या मनावर मोठा परिणाम झाला असून भीतीपोटी ती घरातून बाहेर येण्यास धजावत नाही. आई-वडील शाळेत ने-आण करतात. आई-वडीलही भीतीच्या छत्रछायेखाली असून दोन्ही मुलींच्या भविष्याच्या विचारात चिंताक्रांत झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा