मागील वर्षांप्रमाणे यंदाही शिवसेनेचा विरोध केवळ इशाऱ्यापुरताच मर्यादित राहिल्याने प्रेमीजनांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ उत्साहात साजरा केला. शिवसैनिकांपेक्षाही पोलिसांच्या धाकाचा सामना प्रेमीजनांना करावा लागला. त्यामुळे महाविद्यालयीन परिसरात विशेष गर्दी जाणवत नसताना शहराबाहेरील पर्यटन स्थळ आणि चित्रपट गृहांमध्ये युवा वर्गाने चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले.
व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी कॉलेज रोड, महात्मा गांधी रोड, बिग बझार, सिटी सेंटर मॉलसह आर्चिज् गॅलरी येथे भेट वस्तु खरेदीसाठी सकाळी प्रेमीजनांची झुंबड उडाली होती. युवा वर्गांची आवड लक्षात घेता गुलाबांचा हँडबुके, स्टॅंड बुकेसह, गोबऱ्या गालाचा टेडीबिअर, डॉल, लव्हबर्ड, की चेन, डान्सिंग कपल असे विविध पर्याय दुकानदारांनी खुले करून दिले होते. शिवसेनेने यंदाही या दिवसाला विरोध केला असला तरी त्यांच्या विरोधाला कोणी फारसे जुमानले नाही. पोलिसांनी मात्र या दिवशी होणारी हुल्लडबाजी आणि युवकांच्या सूसाट वाहनांना आवर घालण्यासाठी चांगलीच तयारी केली होती. महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष बंदोबस्त सका़ळपासूनच ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता. उत्साहाच्या भरात युवतींची छेडछाड किंवा अश्लील हावभाव केल्यामुळे अनेकांना पोलिसांनी त्यांच्या पध्दतीने समज दिली. कॅनडा कॉर्नर ते भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोलीस परिस्थितीवर नजर ठेवून होते. साध्या वेशातही अनेक पोलीस होते. टवाळखोरांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश मिळू नये म्हणून महाविद्यालय व्यवस्थापनाच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. बहुतेक विद्यार्थ्यांच्या हातात वह्या-पुस्तकांसह गुलाबाचे फुल, शुभेच्छापत्रे दिसून आली.
पोलिसांच्या धाकाने महाविद्यालयीन परिसरात फारशी वर्दळ आढळून आली नाही. बहुतेक प्रेमीजनांनी आपला
मोर्चा रेस्टॉरंट, चित्रपटगृह नवश्या गणपती, बालाजी मंदिर, गोदापार्क, पांडवलेणी, गंगापूर धरण या ठिकाणी वळविला होता.

Story img Loader