पोलीस उपनिरीक्षकाच्या जाचाला कंटाळून पांढरकवाडा येथील विजय मंदिकुंटावार (३०), व दातपाडी येथील कविता राठोर (२८) या प्रेमीयुगुलाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पांढकवडा येथे घडली. या घटनेमुळे संतप्त जमावाने मोर्चा काढून निषेध केला.
 कविताच्या कुटुंबीयांनी तिच्या मनाविरुद्ध दुसऱ्या युवकाशी विवाह करून दिला. परंतु आठवडय़ाभरातच ती पतीच्या घरून परत येऊन  विजयबरोबर पांढकरवडा येथे एकत्र राहू लागली. याविषयी पांढकरवडा पोलीस ठाण्यात तिच्या कुटुंबीयांनी तक्रार केली असता विजय यास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश डाबरे यांनी त्यांना सतत अश्लील शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला.  या त्रासाला कंटाळून अशी चिठ्ठी लिहून या दोघांनी मंगळवारी शिबला मार्गावरील रामदेवबाबा लेआऊटमधील एका देवळात  विषारी द्रव्य प्राशन केले.  दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.  संतप्त जमावाने डाबरे यास अटक  होणार नाही तोपर्यंत विजयवर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भूमिका  घेतली. शेवटी पोलिसांनी  डाबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Story img Loader