उत्तर नागपुरातील आनंदनगरात एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या प्रेमी युगुलाचा संशयास्पद मृत्यू झाला असून तरुणाचा खून करण्यात आला असल्याचा आरोप त्याच्या भावाने पोलिसांजवळ केला. पोलिसांनी मात्र याप्रकरणी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
खुशबू नारायण हरोडे व मयूर त्र्यंबक मेश्राम ही मृतांची नावे आहेत. खुशबूचा मृत्यू विषारीद्रव्य प्राशनाने तर मयूरचा मृत्यू धारदार शस्त्राने भोसकल्याने झाला. दोघांचाही मृत्यू झाल्याची सूचना मेयो रुग्णालयातील बूथवरून यशोधरानगर पोलिसांना मिळाली. याप्रकरणी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी चौकशी सुरू केली. कांजी हाऊसजवळ या दोघांचे राहणे. मयूर मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असून त्याचे मोबाईलचे दुकान आहे. आई-वडील, दोन भाऊ व एक विवाहित बहीण असे त्याचे सर्वसामान्य कुटुंब. खुशबूचे आई-वडील मजुरी करतात. तिला एक भाऊ आहे. गेल्या काही वर्षांपासून ते येथे राहतात. दोन्ही कुटुंबांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, खुशबू व मयूर यांचे प्रेम जुळले. ही बाब सर्वानाच माहिती होती. दोन्ही कुटुंबांनी यास विरोध दर्शविला. खुशबूच्या घरी यावरून खटकेही उडाले होते. मयूरला प्रेम प्रकरणासंबंधी तंबी देऊन त्याचे लग्न उरकण्याचा विचारही त्याच्या कुटुंबीयांनी केला होता.
काल बुधवारी दुपारी घरी कुणी नसताना तिने विषारीद्रव्य प्राशन केले. दुपारी चार वाजताच्या सुमारास ती घरात पडलेली कुणालातरी दिसली. वस्तीत ही बाब लपून राहिली नाही. वस्तीतील लोकांची तेथे गर्दी झाली. तिला आधी एका खासगी रुग्णालयात व तेथून मेयो रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. ती गेल्याचे मयूरला समजले. मयूरने दुकान बंद करून रात्री सात वाजताच्या सुमारास मित्रासह खुशबूचे घर गाठले. तो आत गेला. खुशबूच्या कुटुंबीयांशी त्याचा वाद झाला. तो बाहेर आला तेव्हा त्याच्या पोटातून रक्तस्राव सुरू असल्याचे त्याच्या मित्राला दिसले. त्याने लगेचच मयूरच्या वहिनीला कळविले. त्याचा भाऊही आला. त्यांनी लगेचच गंभीर जखमी मयूरला मेयो रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पोट व बरगडीजवळ धारदार शस्त्राने भोसकल्याच्या खुणा होत्या. त्याची आतडी बाहेर आली होती. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. हे समजल्यानंतर यशोधरा नगर पोलीस रुग्णालयात पोहोचले.
दरम्यान, पोलिसांनी मयूरच्या मित्राची जबानी नोंदविली. त्यावरून ‘मयूरने स्वत:च पोटावर धारदार शस्त्राने मारून घेतल्याने गंभीर जखमी झाला’ अशी नोंद केली असली तरी मयूरचा खून झाला असल्याचा आरोप मयूरच्या भावाने पोलिसांजवळ व्यक्त केला आहे. मयूर त्या मुलीच्या घरात गेला तेव्हा त्याचे भांडण झाले. मयूरच्या पोटातील जखमा खोल होत्या. ताकदीने शस्त्र आत खुपसल्याशिवाय इतक्या खोल जखमा होऊच शकत नाही. स्वत:च शस्त्राने मारून घेतले असते तर इतक्या खोल जखमा झाल्याच नसत्या, असे त्याने पोलिसांना सांगितले.

Story img Loader