* ‘म्हाडा’चीही घरे महागणार?
* पूर्वीपेक्षा अधिक मोठी जागा मिळणार!
*  रेडी रेकनरनुसार ठरणार किंमत
सामान्यांसाठी परवडणारी घरे बांधणाऱ्या म्हाडामार्फत यापुढे उभारलेल्या जाणाऱ्या घरांच्या किमतीबाबत नवे धोरण तयार करताना ‘रेडी रेकनर’चा दर गृहित धरण्यात येणार असल्यामुळे भविष्यातील घरांच्या किमती किमान १० ते २५ टक्क्य़ांनी वाढण्याची शक्यता आहे. अर्थात या नव्या धोरणात प्रत्येक गटातील घरांचे क्षेत्रफळही वाढणार आहे. याबाबतचे धोरण तूर्तास प्राथमिक स्वरूपात असून त्यावर शिक्कामोर्तब झाले की, नव्या किमती लागू होणार आहेत. २०११ मधील सोडतील मालवणी आणि पवई येथील घरांच्या किमती अनुक्रमे अडीच लाख व १५ लाखांनी वाढविल्यानंतर टीकेला सामोरे जावे लागलेल्या म्हाडाने आता नव्या घरांच्या जाहिराती देण्याआधीच किमती निश्चित करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मागील वेळी जाहिरात दिल्यानंतर घरांच्या किमती कमी असल्याचे म्हाडाच्या लक्षात आले. मात्र त्यामुळे अर्जदारांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला आहे. या पाश्र्वभूमीवर म्हाडाने हे धोरण निश्चित केले आहे.
म्हाडा घराच्या किमती या पूर्वी भूखंड खरेदी व बांधकामाची किंमत एकत्र करून ठरविल्या जात होत्या. हा दर रेडी रेकनरपेक्षा खूप कमी असे.
आता मात्र प्रत्येक परिसरातील म्हाडा घराच्या किमती या रेडी रेकनरनुसार ठरणार असल्यामुळे यापुढे अत्यल्प गटातील घरासाठीही जादा दर मोजावे लागणार आहेत. रेडी रेकनरच्या दरानुसार घरांच्या किमती निश्चित केल्या जाणार असल्यामुळे दरात किमान १० ते २५ टक्क्य़ांची वाढ होईल, असेही सूत्रांनी सांगितले.     

घरांचे गटनिहाय नवे क्षेत्रफळ
अत्यल्प गट – ४३५ चौ. फूट;
अल्प गट – ६१० चौ. फूट;
मध्यम गट – ७६२ चौ. फूट;
उच्च गट – एक हजार ४५ चौ. फूट  

टागोर नगरातील किमान घर १९ लाखांचे?
टागोर नगर येथे म्हाडातर्फे बांधल्या जाणाऱ्या प्रस्तावित घरांचे दर ‘लोकसत्ता’च्या हाती आले आहेत. या दरांनुसार अत्यल्प गटातील घरासाठी १९ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. अत्यल्प गटासाठी पूर्वी १८० चौरस फुटाच्या सदनिका बांधल्या जात होत्या. त्याऐवजी ४३५ चौ. फुटाची सदनिका मिळणार आहे. मात्र रेडी रेकनरमुळे तूर्तास ४३०० रुपयांचा दर मोजावा लागणार आहे. याच परिसरात म्हाडाच्या पूर्वीच्या धोरणानुसार तीन ते साडेतीन हजार रुपयांचा दर द्यावा लागला असता. प्रत्यक्षात सदनिका विक्रीच्या वेळी त्यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे. या दरानुसार अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी अनुक्रमे ३६, ५८ आणि ८५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. २०११ च्या सोडतीत मालवणीतील अल्प उत्पन्न गटातील घर पाच लाख रुपये किमतीला होते तर बोरिवलीतील मोठे घर ५० लाखांना होते.

म्हाडाची नफेखोरी!
सर्वसामान्यांना वाजवी भावात घरे उपलब्ध करून देणे हे वास्तविक म्हाडाचे कर्तव्य आहे. किंबहुना याच साठी म्हाडाचे अस्तित्व आहे. म्हाडा आणि अन्य बिल्डर यांच्यामध्ये हा मूलभूत फरक आहे. मुंबईत मलबार हिल आणि भांडूप येथे घरांच्या किमतीत प्रचंड तफावत आहे. ‘मोक्याची जागा’ हाच एकमेव मुद्दा या तफावतीला कारणीभूत असतो. मात्र बांधकाम खर्च दोन्ही ठिकाणी सारखाच असतो. मात्र अन्य बिल्डरांच्या तुलनेत म्हाडाला भूखंडासाठी नगण्य रक्कम खर्च करावी लागते. असे असतानाही म्हाडाने आपल्या भविष्यातील घरांच्या किंमती ‘रेडी रेकनर’च्या निकषांवर ठरविण्याचा निर्णय हा बिल्डर लॉबीचे भले करण्यासाठीच घेतलेला आहे, अशी टीका होत आहे. ज्या परिसरात म्हाडाची घरे आहेत त्या परिसरातील अन्य बिल्डरांना त्यांच्या घरांच्या किमती फार वाढविता येत नाही. त्या वाढविण्यासाठी म्हाडाचीच घरे महाग करण्याची ही खेळी असल्याचेही बोलले जात आहे.     

Story img Loader