* ‘म्हाडा’चीही घरे महागणार?
* पूर्वीपेक्षा अधिक मोठी जागा मिळणार!
* रेडी रेकनरनुसार ठरणार किंमत
सामान्यांसाठी परवडणारी घरे बांधणाऱ्या म्हाडामार्फत यापुढे उभारलेल्या जाणाऱ्या घरांच्या किमतीबाबत नवे धोरण तयार करताना ‘रेडी रेकनर’चा दर गृहित धरण्यात येणार असल्यामुळे भविष्यातील घरांच्या किमती किमान १० ते २५ टक्क्य़ांनी वाढण्याची शक्यता आहे. अर्थात या नव्या धोरणात प्रत्येक गटातील घरांचे क्षेत्रफळही वाढणार आहे. याबाबतचे धोरण तूर्तास प्राथमिक स्वरूपात असून त्यावर शिक्कामोर्तब झाले की, नव्या किमती लागू होणार आहेत. २०११ मधील सोडतील मालवणी आणि पवई येथील घरांच्या किमती अनुक्रमे अडीच लाख व १५ लाखांनी वाढविल्यानंतर टीकेला सामोरे जावे लागलेल्या म्हाडाने आता नव्या घरांच्या जाहिराती देण्याआधीच किमती निश्चित करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मागील वेळी जाहिरात दिल्यानंतर घरांच्या किमती कमी असल्याचे म्हाडाच्या लक्षात आले. मात्र त्यामुळे अर्जदारांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला आहे. या पाश्र्वभूमीवर म्हाडाने हे धोरण निश्चित केले आहे.
म्हाडा घराच्या किमती या पूर्वी भूखंड खरेदी व बांधकामाची किंमत एकत्र करून ठरविल्या जात होत्या. हा दर रेडी रेकनरपेक्षा खूप कमी असे.
आता मात्र प्रत्येक परिसरातील म्हाडा घराच्या किमती या रेडी रेकनरनुसार ठरणार असल्यामुळे यापुढे अत्यल्प गटातील घरासाठीही जादा दर मोजावे लागणार आहेत. रेडी रेकनरच्या दरानुसार घरांच्या किमती निश्चित केल्या जाणार असल्यामुळे दरात किमान १० ते २५ टक्क्य़ांची वाढ होईल, असेही सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा