निकृष्ट दर्जाचा मोबाईल विकून ग्राहकाला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सॅमसंग इंडिया प्रा. लि. आणि त्यांच्या अधिकृत डिलर कंपनीला दोषी धरत संबंधित ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून १८ हजार रुपये देण्याचे आदेश देत दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक मंचाने कंपनीला दणका दिला. एवढेच नव्हे, तर कंपनीने या ग्राहकाला विकत घेतलेल्या फोनपेक्षा अधिक चांगला आणि अत्याधुनिक फोन देण्याचे निर्देशही दिले.
जोगेश्वरी येथील रहिवाशी रिझवान खत्री यांनी ३१ डिसेंबर २०११ रोजी सॅमसंग गॅलक्सी एस-२-जीटी-१९१०० हा मोबाईल झूप या कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून विकत घेतला होता. या फोनसाठी खत्री यांनी २९,५०० रुपये मोजले. चार महिन्यांनी म्हणजेच ११ एप्रिल २०१२ रोजी खत्री यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार करीत आपली कंपनीतर्फे फसवणूक केल्याचा आरोप केला. खत्री यांच्या तक्रारीनुसार, फोनच्या खरेदी पावतीवर फोनचा मॉडेल क्रमांक जीटी-१९१०० लिहिलेला होता आणि प्रत्यक्षात फोनच्या बॉक्सवर मॉडेल क्रमांक जीटी – १९१०० जी हा लिहिलेला होता. जो फोन खरेदी करण्यात आलेल्या फोनपेक्षा कमी दर्जाचा होता.
या दोन्ही मोबाईलमध्ये केवळ टेक्नोलॉजीबाबतीच नव्हे, तर सगळ्याच बाबतीत फरक होता. बरीचशी अॅप्लिकेशन्स त्यामध्ये नव्हती अथवा नीट कायर्रत नव्हती अशी तक्रार करीत खत्री यांनी त्याचा पुरावाही मंचासमोर सादर केला.
१० जानेवारी २०१२ रोजी खत्री यांनी चुकीचा मोबाईल दिल्याचे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले. परंतु निकृष्ट दर्जाच्या उत्पादनाची बाब वगळता दोन्ही मोबाईल मॉडेल सारखीच असल्याची खोटी माहिती कंपनीने आपल्याला देऊन दिशाभूल केल्याची तक्रार खत्री यांनी केली. शिवाय कंपनीच्या डिकोिडगमुळे दोन्ही मोबाईलचे मॉडेल क्रमांक बदलल्याचे आणि त्यामुळे फोनच्या चालण्यावर काहीच फरक पडणार नसल्याचेही कळविण्यात आले.
कंपनीने कुठल्याही भरपाईशिवाय फोन परत करण्याची तयारी खत्री यांना दाखवली. परंतु अशाच एका प्रकरणात कंपनीने फोन बदलून देण्यासोबत नुकसान भरपाई दिल्याची बाब खत्री यांनी सुनावणीच्या वेळी मंचाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच कामाचे स्वरूप लक्षात घेऊन आपण फोन खरेदी केला होता. पण निकृष्ट दर्जाच्या फोनमुळे आपल्या कामावर परिणाम होऊन कामाचे नुकसान झाल्याचा आरोप केला. या सगळ्यामुळे आपल्याला कमालीचा मानसिक त्रास झाल्याचेही त्यांनी मंचाला सांगितले.
दरम्यान, सुनावणीच्या वेळी कंपनीतर्फे केवळ एकदाच बाजू मांडण्यात आली. त्यानंतर कंपनीतर्फे कुणीच सुनावणीसाठी हजर झाले नाही. त्यामुळे मंचाने खत्री यांचीच बाजू एकून निकृष्ट दर्जाचा फोन विकल्याप्रकरणी कंपनीला दोषी धरून खत्री यांना १८ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
निकृष्ट दर्जाचा मोबाईल विकणाऱ्या ‘सॅमसंग’ला न्यायालयाचा दणका
निकृष्ट दर्जाचा मोबाईल विकून ग्राहकाला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सॅमसंग इंडिया प्रा. लि. आणि त्यांच्या अधिकृत डिलर कंपनीला दोषी धरत संबंधित ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून १८ हजार रुपये देण्याचे आदेश देत दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक मंचाने कंपनीला दणका दिला.
First published on: 12-04-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low quality mobile court ordered to samsang to pay fine