येथील रामनगरात होत असलेल्या ६० सदनिकांच्या इमारतींचे काम अत्यंत निकृष्ट असल्याचे घटनास्थळी भेट दिल्यावर स्पष्ट होते. सदनिकांचे बांधकाम  अवैध असल्याची नोटीस अकोला महापालिकेने बजावली असल्याची माहिती नगररचना विभागाच्या अभियंत्याने दिली. त्यामुळे येथे होणाऱ्या अवैध व निकृष्ट बांधकामास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज आता व्यक्त केली जात आहे. म्हाडाचे स्थानिक अभियंता सोनवणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनीवर माहिती देण्यास नकार देऊन ऑफिस येण्याचे फर्मान सोडले.
या शहराच्या मध्यवर्ती भागात रामनगर मौजे उमरखेड येथे म्हाडाच्या ६० सदनिकांच्या पाच अपार्टमेंटपैकी काहींचे काम सुरू झाले आहे. यासाठी म्हाडाने वेलकिन बिल्डर्स इन्फ्रांस्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला सुमारे चार कोटींचे कंत्राट दिले, पण हे काम स्थापत्यशास्त्राप्रमाणे होत नसल्याचा दावा काहींनी केला. कॉलम पुटींग करताना मुरूम टाकण्याची गरज असताना त्या ठिकाणी थेट पिवळी माती व त्या मातीवर मुरूम टाकण्याचा उद्योग सुरू असल्याचे चित्र होते. अत्यंत गंभीर बाब असून भूकंपरोधक इमारत अशा प्रकारे निर्माण होऊ शकत नाही, असा दावा स्थापत्य अभियंत्यांने केला. येथे कॉलमचा जोड देतानाही वरच्यावर देण्याचा प्रकार उघडकीस आला. या बांधकामाच्या घटनास्थळी पाहणी केल्यावर येथे म्हाडाचे अभियंता व कर्मचाऱ्यांची देखरेख नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे या कामाबद्दल संशय निर्माण होत आहे. तयार झालेले बांधकाम मजबूत होण्यासाठी त्यावर पाणी टाकण्याची तसदीही संबंधित यंत्रणा घेत नसल्याची माहिती मिळाली. या जिल्ह्य़ात रेती घाटांचा लिलाव थांबल्याने येथे काँक्रीटमध्ये थेट गिट्टीचा चुरा वापरण्यात येत असून तो अतांत्रिक असल्याची माहिती मिळाली. झालेल्या सर्व बांधकामांची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रक विभागाकडून करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे, तसेच अमरावती येथील म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आकस्मिक भेट देऊन या भागाची पाहणी करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हे बांधकाम अवैध असून या संबंधीची एक नोटीस महापालिकेने संबंधित यंत्रणेला बजावली असल्याचे महापालिका नगररचना विभागाचे अभियंता नरेंद्र टापरे यांनी सांगितले. या सर्व प्रकरणात म्हाडाचे अकोला येथील अभियंता सोनवणे यांना भ्रमणध्वनीवर विचारणा केली असता त्यांनी महापालिकेने बांधकामाची परवानगी दिल्याचे स्पष्ट केले. अवैध व निकृष्ट बांधकामांबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यास नकार दिला, तर ऑफिसात भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते साईटवर गेल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली.  जेसीबी मशिनच्या सहाय्याने येथे कॉलम पुटींग भरण्यात येत असून या जेसीबी मशिनच्या धक्क्याने अनेक कॉलम क्षतीग्रस्त झाल्याचे चित्र घटनास्थळी होते. त्यामुळे अशा कॉलमच्या आधारे निर्माणाधीन बहुमजली इमारत किती काळ टिकाव धरू शकेल, असा प्रश्न उपस्थित होतो.  या सर्व बांधकामाची नियमानुसार चौकशी करण्याची मागणी आता होत आहे. दरम्यान, या ठिकाणी खाजगी कंपनीच्या अभियंत्याने हे काम योग्य पध्दतीने होत असल्याचा दावा केला.