दिवाळीच्या काळात फटाके वाजवणे म्हणजे दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणे हा (गैर) समज आता मागे पडला आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या सामाजिक संस्थांच्या आवाहनांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी ठाण्यातील अनेक भागांमध्ये सकाळचे ध्वनिप्रदूषण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
ठाण्यातील काही वर्षांपूर्वीची दिवाळी ही कानठळ्या बसणाऱ्या कर्णकर्कश फटाक्यांच्या आतषबाजीने सुरू व्हायची. त्यामुळे दिवाळीच्या काळात शहरातील ध्वनिप्रदूषणाची पातळी ९० ते १०० डेसिबल्सपेक्षाही अधिक असे. यंदाच्या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी ठाण्यातील सामाजिक संस्थांनी केलेल्या मोजणीमध्ये ध्वनिप्रदूषण कमालीचे घटल्याचे दिसून आले आहे. यंदा येथे आवाजाची तीव्रता सरासरी ७० ते ८५ डेसिबल्सच्या आसपास होती. डॉ बेडेकर हॉस्पिटल हा परिसर शांतता क्षेत्र असूनही सकाळी ६ वाजता या भागातील ध्वनिप्रदूषणाची पातळी ७० ते ८० डेसिबल्सच्या दरम्यान होती तर ६ वाजून २० मिनिटांनी राम मारुती रोडवरील आवाजाची तीव्रता ७५ ते ८० डेसिबल्स होती. सकाळी सव्वा सात वाजता पाचपाखाडी परिसरात आवाजाची तीव्रता ८० ते ८५ डेसिबल्स होती. सकाळी पावणे आठच्या सुमारास हिरानंदानी मेडोज येथील ध्वनिप्रदूषणाची पातळी ८० ते ८८ डेसिबल्सपर्यंत होती.
दिवाळीपूर्वी राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने अनेक संस्था फटाकेविरहित दिवाळीसाठी मोठी जनजागृती करत असतात. त्याचबरोबर ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट, पर्यावरण दक्षता मंच, कल्याणची इको-ड्राईव्ह यंगस्टर्स, अनेक शाळा-महाविद्यालयांनी गेल्या अनेक वर्षांपासून मोठय़ा आवाजांचे फटाके वाजवू नका, असे आवाहन करत जनजागृती केली होती. त्याचा परिणाम म्हणून यंदा फटाक्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे.
संध्याकाळी मात्र प्रदूषणाची पातळी कायम..
सकाळच्या वेळात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात आवाजाच्या पातळीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले असले तरी सायंकाळच्या वेळात मात्र अनेक भागांमध्ये सरासरी पातळी ९० ते ९५ डेसिबल्सपर्यंत पोहचली होती. त्यामुळे संध्याकाळी ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण मात्र कायम होते असे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.