नव्या वर्षांच्या स्वागताचे पर्यायाने ‘थर्टीफर्स्ट’चे वेध लागले असतानाच थंडीने आज पुन्हा नगरकरांना हुडहुडी भरली. जिल्ह्य़ात पुन्हा एकदा ५.९ अशा निच्चांकी तपमानाची नोंद झाली. या हंगामातील जिल्ह्य़ातीलही हा निच्चांक आहे.
मागच्या दोन दिवसांपासून जिल्ह्य़ात पुन्हा थंडीला सुरूवात झाली. कालच (बुधवार) दुपारनंतर शहरात थंडीची चाहूल लागली होती, सायंकाळनंतर त्याचा कडाका आणखीनच वाढला. सायंकाळनंतर शहरातील रस्तेही बऱ्यापैकी निर्जन झाले होते. रात्री व आज पहाटे शब्दश: हुडहुडी भरावी असेच वातावरण होते. आज दिवसाही सातत्याने थंडीची जाणीव होत होती. सायंकाळनंतर त्यात वाऱ्याची भर पडली.
तीन आठवडय़ांपूर्वी शहर व परिसरात सलग तीन ते चार दिवस निच्चांकी तपमान नोंदवले गेले होते. मात्र त्यावेळी ते सात अंशापर्यंत होते. मागच्या चोवीस तासांत पारा सहाच्याही खाली घसरला. दरम्यान, गव्हाला ही थंडी पोषक ठरणार आहे. त्यामुळे बागायती भागात शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते.    

Story img Loader