आधारक्रमांशी निगडित बँक खात्यात गॅस सिलिंडरचे अनुदान जमा करण्याची योजना अमरावती जिल्ह्य़ात लागू झालेली असताना आतापर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाली खरी, पण येत्या ३१ डिसेंबपर्यंत जे गॅस ग्राहक बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक गॅस एजन्सीत सादर करणार नाहीत त्यांना १ जानेवारीपासून अनुदानाला मुकावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
विशेष म्हणजे, आधार क्रमांक असलेल्या जिल्ह्य़ातील २ लाख १९ हजार गॅस ग्राहकांपैकी आतापर्यंत केवळ १ लाख ४५ हजार गॅस ग्राहकांचे बँक खाते क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकांची जोडणी झाली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार या जिल्ह्य़ात गेल्या सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरसाठी बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू झाली. ज्या गॅस ग्राहकांनी आधार क्रमांक बँक खात्यांशी संलग्न केले त्यांना थेट अनुदानाचा लाभ घेता येत आहे. या जिल्ह्य़ात एकूण ३३ गॅस एजन्सी व ३ लाख ८४ हजार १५३ गॅस ग्राहक आहेत. गेल्या २ डिसेंबपर्यंत बँक खाते क्रमांक असलेल्या ग्राहकांची संख्या १ लाख ४० हजार, तर आधार कार्ड काढणाऱ्या गॅस ग्राहकांची संख्या २ लाख १९ हजार होती, पण आतापर्यंत केवळ १ लाख ४० हजार ४१५ गॅस ग्राहकांचे बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांकाची जोडणी होऊ शकली.
गेल्या १७ डिसेंबपर्यंत या जिल्ह्य़ातील सुमारे १ लाख ४० हजार ३८३ गॅस ग्राहकांनी थेट लाभ हस्तांतरण योजनेचा लाभ घेतला होता. या गॅस ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये एकूण ७ कोटी ५५ लाख रुपयांचे अनुदान जमा झाले होते. सर्व घरगुती गॅस ग्राहकांनी बँकेत जाऊन बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांकांची तात्काळ जोडणी करून घ्यावी, तसेच गॅस एजन्सीतही बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांकांचे संलग्नीकरण करून घ्यावे, येत्या ३१ डिसेंबपर्यंत त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहेत. जे गॅस ग्राहक या तारखेपर्यंत संलग्नीकरण करणार नाहीत त्यांना नव्या वर्षांत १ जानेवारीपासून विना अनुदानित दराने गॅस सिलिंडर घ्यावे लागेल, असे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितले.
मध्यंतरीच्या काळात आधार क्रमांकासाठी नोंदणी या जिल्ह्य़ात संथगतीने सुरू होती, पण आतापर्यंत एकूण २८ लाख ८७ हजार ८२६ नागरिकांपैकी २६ लाख ३८ हजार ४८९ नागरिकांनी आधार क्रमांकासाठी नोंदणी केली आहे. हे प्रमाण ८४ टक्के आहे. अपुऱ्या साधनांमुळे अनेक भागात आधार नोंदणी केंद्रांवर गर्दी मोठय़ा प्रमाणात वाढली होती. आधार क्रमाकांशी निगडित बँक खात्यांमध्ये केंद्र पुरस्कृत ३४ योजनांचा थेट लाभ जमा करण्याची योजना अमरावतीसह सहा जिल्ह्य़ांमध्ये सुरू करण्यात आली होती. या जिल्ह्य़ातील गॅस ग्राहकांना आधार क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०१३ ही तारीख देण्यात आली. त्यानंतर १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. गेले काही महिने मुदतवाढ मिळत गेली, पण ३१ डिसेंबर ही अखेरची मुदतवाढ राहील, असे संकेत आहेत. आधार क्रमांकांच्या नोंदणीसाठी केंद्रांवर गॅसधारकांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या, पण त्याचा फारसा परिणाम या जिल्ह्य़ात जाणवला नाही.

Story img Loader