एकीकडे काँग्रेस सरकारने शासकीय पैशाची उधळपट्टी थांबविण्यासाठी मंत्र्यांच्या पंचतारांकित हॉटेलमधील बैठकीवर निबर्ंध घातले असताना काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागपूर भेटीसाठी अमरावती मार्गावरील सुराबर्डीतील एक अत्यंत महागडे वातानुकुलित फार्म हाऊस बुक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीला अद्याप सहा महिन्याचा कालावधी असला तरी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी २३ व २४ सप्टेंबरला विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा निश्चित असा कुठलाही कार्यक्रम आला नसल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी पक्षाचे त्यांचे येणे निश्चित समजले जात आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना शासकीय पैशाची उधळपट्टी थांबविण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमधील बैठकीवर काँग्रेसने निबर्ंध घातले असून तशा सूचना दिल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या विमान प्रवास यावर काही काळासाठी बंदी आणली आहे. आर्थिक तूट कमी करण्यासाठी आणि कोलमडलेल्या अर्थ व्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारने ही पावले उचलले असताना प्रदेश काँग्रेसने नागपूरपासून १० किमी अंतरावर असलेल्या सुराबर्डीमधील अग्रवाल यांच्या आलिशान फार्म हाऊसवर बैठकीचे आयोजन करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. या फार्म हाऊसमध्ये वातानुकुलित अशा २४ खोल्या तसेच चार आलिशान सूट आहेत. शिवाय दोन मोठी वातानुकूलित सभागृहे असून शिवाय आजूबाजूला निसर्गरम्य परिसर आहे. या फार्म हाऊसचे एक दिवसाचे भाडे ६ लाख रुपये आहे. राहुल गांधी यांच्या बैठकीच्या निमित्ताने २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान या फार्म हाऊसमध्ये सामान्य लोकांना प्रवेश देण्यात येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी नागपूर दौऱ्याच्यावेळी या फार्म हाऊसला भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली. विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनेक ज्येष्ठ नेते, राज्यातील मंत्री या बैठकीसाठी येणार असल्यामुळे अग्रवाल फार्म हाऊसवर गेल्या दहा दिवसांपासून तयारी सुरू झाली आहे. ही बैठक ‘इन कॅमेरा’ राहणार असून राहूल गांधी प्रत्येक लोकप्रतिनिधीशी संवाद साधणार असून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा असल्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा एसपीजीच्या पथकाने आज नागपुरात आढावा घेतला. मिळालेल्या माहितीनुसार २३ व २४ सप्टेंबर असे दोन दिवस ही सुरक्षा यंत्रणा फार्म हाऊसचा ताबा घेणार आहे. काँग्रेस नेत्यांशी थेट संवाद साधण्यासाठी राहूल गांधी यांच्या दौऱ्यात कोटय़वधी रुपये खर्च होईल, असा अंदाज आहे.
राहुल गांधींच्या नागपूर भेटीसाठी आलिशान फार्म हाऊसची चर्चा
एकीकडे काँग्रेस सरकारने शासकीय पैशाची उधळपट्टी थांबविण्यासाठी मंत्र्यांच्या पंचतारांकित हॉटेलमधील बैठकीवर निबर्ंध घातले असताना
First published on: 21-09-2013 at 08:07 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Luxury farm house for rahul gandhi to nagpur visit