वाहन उद्योगांना सुटे भाग पुरविणाऱ्या सुपे लघुऔद्योगिक वसाहतीतील डय़ुक कापरेरेशन या कारखान्यात शनिवारी रात्रीपासून व्यवस्थापन व कामगारांमध्ये यंत्रसामुग्री हलविण्याच्या कारणावरून संघर्ष सुरू झाला आहे. कामगारांचा दोन महिन्यांचा पगार, तसेच बोनस रखडला असून व्यवस्थापनाने टाळेबंदीचा निर्णय घेतल्याचा आरोप करीत कामगारांनी रात्रीपासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, कारखान्याचे व्यवस्थापक संजय बनकर यांच्याशी संपर्क साधला असता सोमवारी कामगारांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे सांगून टाळेबंदीच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले.
टाटा, बजाज, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा आदी नामांकित कंपन्यांना गेल्या बारा वर्षांपासून या कंपनीकडून सुटे भाग पुरविले जातात. वाढत्या महागाईमुळे सुटे भाग घेणाऱ्या कंपन्यांनी भाव वाढवून देण्यास असमर्थता दर्शविल्याने सध्या हा कारखाना तोटय़ात आहे. त्यामुळेच कामगारांचे पगार मिळण्यास विलंब होत आहे.
गेल्या दोन महिन्यांच्या पगारासंदर्भात, तसेच बोनसबाबत व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधींमध्ये बैठक होऊन अनावश्यक यंत्रसामुग्री व भंगार विक्री करून पगार व बोनस अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसारच गेल्या तीन दिवसांपासून मशिनरी कारखान्याबाहेर काढण्यात येत होती. शनिवारी रात्री मुख्य यंत्रसामुग्रीच काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची कुणकुण कामगारांना लागताच ते रात्रीच कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ जमा झाले. ही यंत्रसामुग्री बाहेर काढण्यास त्यांनी मज्जाव केला. सुप्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनाही तेथे पाचारण करण्यात आले. या पेचातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची त्यांना विनंती करण्यात आली. पाटील यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोमवारी तहसीलदार जितेंद्र वळवी यांच्यासमवेत व्यवस्थापन व कर्मचारी प्रतिनिधी यांची बैठक बोलविली असल्याचे ते म्हणाले. कारखाना परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कामगारांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
शनिवारी कारखान्यास सुटी होती तरीही व्यवस्थापनाने ११ ते १४ दिपावली, १५ नोहेंबरला गणेशोत्सवाची शिल्लक सुटी अशा पाच दिवस पगारी सुटया व १६ नोहेंबरला बिन पगारी सुटी जाहीर केली. सुटीच्या कालावधीत सर्व यंत्रसामुग्री येथून अन्यत्र हलवून व्यवस्थापन टाळेबंदी करणार असल्याचा कामगारांचा संशय आहे.
यासंदर्भात कारखान्याचे व्यवस्थापक संजय बनकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून कारखाना तोटय़ात आहे. त्यामुळेच पगार विलंबाने होत आहेत. अनावश्यक यंत्रसामुग्री, तसेच भंगार विक्री करून पगार व एक महिन्याच्या पगाराइतका बोनस देण्याचे आम्ही मान्य केले होते. रविवारी कामगारांना रोख स्वरूपात बोनस वाटण्यात येणार होता, मात्र कामगारांनी शनिवारी रात्रीच गोंधळ केल्याने वाटप करता आले नाही. टाळेबंदी करण्याचे व्यवस्थापनाचे धोरण नसून कामगारांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा