दिग्दर्शक मधुर भांडारकरला कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. ३५ वा कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून सुरू झाला असून मधुर या महोत्सवात विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटकर्मीबरोबर परीक्षक म्हणून काम पाहणार आहे.
‘कैरो चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागाचा परीक्षक होण्याचा मान मला मिळाला याबद्दल खूप आनंद झाला आहे. कैरो महोत्सव यावर्षी ‘आशावादी विचारसरणी, क्रांती आणि स्वातंत्र्य’ या संकल्पनांभोवती गुंफण्यात आला आहे. मला स्वत:ला मनापासून या संकल्पना आवडल्या. त्यामुळे महोत्सवाच्या आयोजकांनी दिलेले निमंत्रण मी आनंदाने स्वीकारले’, अशी भावना मधुरने व्यक्त केली आहे.
करीना कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘हिरॉईन’ हा चित्रपट मधुरने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पाहिजे तसे यश न मिळाल्याने नाराज झालेल्या मधुरसाठी हे आमंत्रण आनंदाचा शिडकावा ठरले आहे. २०१० च्या महोत्सवानंतर यावर्षी होणाऱ्या ३५ व्या कैरो चित्रपट महोत्सवात अरब आणि आफ्रिकी चित्रपटांच्या विशेष पॅकेजचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, चित्रपट निर्मिती-दिग्दर्शन अशा अनेक विषयांवरच्या कार्यशाळा, व्याख्यानेही या महोत्सवात होणार आहे. आपल्या देशातील करण जोहर दिग्दर्शित ‘अग्नीपथ’, रितुपर्णो घोषचा ‘चित्रांगदा’, तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित ‘पानसिंग तोमार’ हे चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.