मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाने उत्तर महाराष्ट्रात चमत्कार घडविला असून तापी नदीला आलेल्या पुराने जळगावसह धुळे जिल्ह्यातील अनेक गावांना प्रशासनातर्फे धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण पूर्ण भरल्याने चार लाख ७६ हजार ४३४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळे तापीला आलेल्या पुराने जळगाव जिल्ह्यातील रावेर, चोपडा व मुक्ताईनगर या तालुक्यांमधील शेतीचे कोटय़वधींचे नुकसान केले आहे. तर ३१ कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्य़ातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील अनुक्रमे २४ व २९ गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी तापीचे पाणी ओसरण्यास सुरूवात झाली असली तरी धोका कायम आहे. रावेर तालुक्यातील शिरवळ, कुसुंबा, निंबोर, अडनाळ, अंबोरी, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, भोकरी, कोथळी, पातेंडी, पिंप्रीनांदूर आदी गावांमधील शेतीचे पुरामुळे नुकसान झाले. रावेर तालुक्यातील ऐनपूर गावातील नुकसानीचा आकडा अधिक असल्याचे सांगितले जाते. केळी, भूईमूग, पेरू पीक भूईसपाट झाले. शेतकऱ्यांना शासनाने भरपाई देण्याची मागणी ऐनपूरचे सरपंच विकास अवसरमल यांनी केली आहे. धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभाागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी हतनूर धरणातून विसर्ग वाढल्यानंतर शिरपूर तालुक्यातील २४ आणि शिंदखेडा तालुक्यातील २८ अशा एकूण ५२ गावांना धोक्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती दिली. शिरपूर तालुक्यात तापीकाठच्या अंतुर्ली, लोंढरे, टेंभे, रुदावली, वनावल, जातोडा, उपरपिंड, आढे, हिंगोणी, गिधाडे, सावळदे, जैतपूर, वाठोडे, थाळनेर, भोरटेक, मांजरोद, घोडसगाव, होळनाथे, भावेर, लोंढे, तोंदे आदींसह २४ तर शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा, हंबर्डे, वडली, जुने कोळदे, जुने लंघाणे, वसमाने, लोहगाव, कुंभारे, रंजाणे, जसाणे, जुनीआच्छी, हिसपूर, सावळदे, साहूर, परसूले, वरपाडे, नेवाडे, सोनेवाडी आदींसह २८ गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला. तापीचे पाणी शिरपूर तालुक्यातील थाळनेर, गिधाडे, बाळदे, मांजरोद, सावळदे, बाभूळदे, उपरपिंड, वनावल, जातोड या गावशिवारात शिरले होते. यामुळे पिके पाण्याखाली गेली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा