आगामी कुंभमेळ्यात गोदावरी आणि नाशिकचे धार्मिकदृष्टया अधिष्ठान लक्षात घेता लाखो भाविक कुंभपर्वात स्नानासाठी येतील. त्यांच्या पुढे गोदा प्रदुषणासह दुषित पाण्याचा आदर्श ठेवायचा का, असा प्रश्न प्रसिध्द जलतज्ज्ञ मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्र सिंह यांनी उपस्थित केला आहे.
येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने गुरुवारी आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. यावेळी डॉ. सिंह यांनी गोदा प्रदूषण आणि सिंहस्थ यावर उहापोह केला. नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे. पुढील वर्षी शहरात कुंभमेळा भरणार आहे. कुंभ पर्व काळात शाही स्नानासह अन्य पर्वण्यांसाठी लाखो भाविक नगरीत दाखल होतील. त्यांच्यासमोर गोदा प्रदुषणामुळे नाशिकची काय प्रतिमा जाईल याचा विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. नदी व नारी यांचे संरक्षण करण्याची शिकवण आपली भारतीय संस्कृती देते. गेल्या काही दिवसांपासून आपण ही संस्कृती विसरत चाललो आहोत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपण गोदावरी शुध्द करू शकलो तरच परिसरातील रोगराई कमी करता येईल.
त्यासाठी सर्व स्तरांतील घटकांनी एकत्र येत कामाला सुरूवात करायला हवी. यासाठी प्रशासन पातळीवर महानगरपालिका, महापौर, नगरसेवक यांनी गोदावरीच्या शुध्दीकरणासाठी मदत करावी, प्रसंगी विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या पातळीवर गोदा स्वच्छतेसाठी प्रयत्न व प्रचार करावा असे आवाहन डॉ. सिंह यांनी केले.
यावेळी अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना गोदावरी स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. पवार यांनी यंदा मविप्र शिक्षण संस्थेचे शताब्दी वर्ष सुरू असल्याचे सांगून यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे नमूद केले. त्याचा भाग म्हणून गोदा स्वच्छता अभियानाची सुरूवात झाली आहे. संस्थेचे गोदा स्वच्छता उपक्रमास सहकार्य राहील असे आश्वासन पवार यांनी दिले. यावेळी प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे राजेश पंडित, निशिकांत पगारे, मनोज जांगडा आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा. अशोक सोनवणे यांनी आभार मानले.

Story img Loader