नव्या वर्षांचे स्वागत गुलाबी थंडीत करण्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईत शंभरावर हॉटेल, फार्म हाऊस सज्ज झाले आहेत. मागील दोन दिवसांत थंडीचा जोर वाढला असून, नववर्षांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणी हाऊसफुल्ल झाले आहे. परिसरातील हॉटेल, बंगले, फार्म हाऊस विद्युत रोषणाईने उजळले आहेत. तर गडांचे व धार्मिक जागांचे पावित्र्य राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नववर्षांच्या स्वागतासाठी हॉटेल फार्म हाऊसेसमध्ये पाटर्य़ा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळपासून वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथे ढगाळ वातावरण आहे. पार्टी आयोजकांनी रीतसर परवाने घ्यावेत आणि कार्यक्रमांच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेकडे काटेकोर लक्ष पुरवावे असे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाने केले आहे. अनेक हॉटेलांत पूर्वीपासूनच इयर एंड व नववर्षांच्या कार्यक्रमासाठी हॉटेल व आपापल्या जागांचे बुकिंग झाले आहे. महाबळेश्वरसह पाचगणीत परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष पुरविण्यात येत आहे.
काही हॉटेल व्यावसायिकांनी पर्यटकांच्या मनोरंजनासाठी जादूचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम राजस्थानी नृत्य आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या दोन दिवसांत किमान साडेतीन-चार हजार वाहने येण्याचा अंदाज आहे. बाजारपेठेत वाढत्या थंडीमुळे पर्यटक शाल, कानटोपी, स्वेटर, हातमोजे, आदी उबदार कपडय़ांची खरेदी करताना दिसत आहेत. महाबळेश्वर पालिकेने बोट क्लबच्या वेळेत वाढ केली आहे. वेण्णा लेकच्या मधोमध कारंजे उभारण्यात आले आहे. विद्युतरोषणाईमुळे ते आकर्षक दिसत आहे. या परिसरात गरमागरम मक्याचे कणीस खाण्यासाठी, घोडेस्वारीचा आनंद लुटण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. तासन्तास वाहनकोंडीचा मनस्ताप मात्र सहन करावा लागत आहे. काही व्हीआयपी, सेलीबेट्रीज व उद्योजक आजच हेलिकॉप्टरने नववर्षांच्या स्वागतासाठी दाखल झाले आहेत.
शासनाने पहाटे पाचपर्यंत नववर्षांच्या सेलिब्रेशनसाठी परवानगी दिली अस्ली तरी सातारा जिल्हय़ात त्याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक दिवसाचे परवाने वाइन शॉपचालकांना दिले आहेत. विनापरवाना पार्टी सुरू असेल तर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. तळीरामांना आवर घालण्यासाठी व विनापरवाना करमणुकीचे कार्यक्रम करणाऱ्यांसाठी कारवाईचे अस्त्र उगारण्यात येणार आहे.
महाबळेश्वर सजले!
नव्या वर्षांचे स्वागत गुलाबी थंडीत करण्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईत शंभरावर हॉटेल, फार्म हाऊस सज्ज झाले आहेत. मागील दोन दिवसांत थंडीचा जोर वाढला असून, नववर्षांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणी हाऊसफुल्ल झाले आहे.
First published on: 31-12-2013 at 02:13 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabaleshwar prepare for celebration of new year