‘तात्काळ दुरुस्ती न झाल्यास १३ सप्टेंबरपासून आंदोलन’
पथकर नाक्यावर अवाच्या सव्वा वसुली सुरू असून राज्य महामार्ग व जिल्हय़ांतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की, साधे पायी चालणे कठीण झाले आहे. एकूणच रस्ते प्रवाशांसाठी मृत्यूचा महामार्ग ठरले असून तात्काळ दुरुस्ती केली नाही, तर येत्या १३ सप्टेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा मर्दानी महिला मंचच्या अध्यक्ष आमदार शोभा फडणवीस यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली.
मुसळधार पावसामुळे या जिल्ह्य़ातील, तसेच राज्य महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. रस्त्यांवर इतके खड्डे आहेत की, खड्डय़ात रस्ता की रस्त्यात खड्डे हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. शहराचा विचार केला तर एकही रस्ता शिल्लक राहिलेला नाही, ज्यावर खड्डे पडलेले नाहीत. मुख्य मार्गासोबतच गल्लीबोळीतील रस्ते रस्ते राहिलेले नसून पायवाटा झालेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना असंख्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. बस, मोटरसायकल व इतर वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना असंख्य आजार जडले आहेत. सांधेदुखी, कंबरदुखी, मानेचा त्रास, पायाचा त्रास व यांसारख्या इतर असंख्य आजारांनी शहरातील हजारो लोक ग्रस्त आहेत. एकूण, प्रवाशांसाठी रस्ते म्हणजे मृत्यूचा महामार्ग ठरले आहेत. अशा वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने, तसेच जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करायला पाहिजे; परंतु तसे काम होताना दिसत नाही. याउलट, रस्त्यांच्या कामात अधिकाधिक भ्रष्टाचार करून रस्ते जास्तीत जास्त निकृष्ट कसे होतील, याची काळजी बांधकाम खाते घेत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप शोभा फडणवीस यांनी केला.
बामणी ते चंद्रपूर रस्त्याला २०१० मध्ये मान्यता देण्यात आली असूनही कंत्राटदाराने या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. राजोली मूल ते जनाळा, नागाळा ते चिचपल्ली या रस्त्याला सहा महिन्यांतच मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देऊनही कारवाई झालेली नाही. केवळ कंत्राटदाराचे हित साधण्याकरिता कंत्राट दिल्याची शंका फडणवीस यांनी व्यक्त केली. रस्त्याच्या दुरवस्थेबरोबर पथकर नाक्याच्या मनमानीमुळे नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या टोलनाक्यावर प्रवाशांकडून अवाच्या सव्वा वसुली केली जात आहे. तसेच सुविधांचा अभाव दिसून येत असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. पथकर नाक्यावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, प्रथमोपचार पेटी, सूचिदर्शक फलक, आपातकालीन द्वार, तक्रार पुस्तिका, विद्युत दिवे, कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र या गोष्टींचा अभाव असून अध्र्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना गणवेश नसल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. पथकर नाक्यावर इलेक्ट्रॉनिक यंत्र, मोठे सूचिदर्शक फलक बसवावेत, जेणेकरून वाहकांची फसवणूक होणार नाही, तसेच पथकर वसुलीच्या नोंदी ठेवाव्यात व कर्मचाऱ्यांचे पोलिसांमार्फत दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र ठेवावे. अन्यथा, येत्या १३ तारखेपासून सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन करण्यात येण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. पत्रपरिषदेला डॉ. रजनी हजारे, नगरसेविका अनिता कथडे, अ‍ॅड. विद्या मसादे, प्रभा चिलखे, अश्विनी खोब्रागडे यांच्यासह बहुसंख्य महिला हजर होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा