* ठाण्यानंतर थेट अंबरनाथ!
* अडथळ्यांमुळे कल्याण-डोंबिवलीत उशीर

चौथी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील अंबरनाथ शहरामध्ये महानगर गॅसचे आगमन झाले असून या शहरातील सुमारे ८०० हून अधिक ग्राहकांना पाइप लाइनद्वारे गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्य़ात ठाणे शहरानंतर थेट अंबरनाथमध्ये पाइप लाइनद्वारे गॅस मिळू लागला आहे.  कल्याण-डोंबिवलीमध्ये मात्र या योजनेचा वेग अत्यंत मंद असून या भागात पाइप लाइनद्वारे गॅस पुरवठा होण्यासाठी वर्षअखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
महानगर गॅसने २००५ मध्ये ठाणे शहरामध्ये आपला विस्तार सुरूकेला. ठाण्यातील घरगुती गॅसधारकांच्या संख्येमध्ये दरवर्षी दहा हजाराने वाढ होत आहे. ठाण्यात सध्या ७० हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. ठाण्यामध्ये वाहनांना गॅस पुरवठा करणाऱ्या केंद्रांची संख्या १७ आहे. ठाणे शहरातील सेवा पुरवठय़ानंतर २०१२ मध्ये कल्याण-डोंबिवलीसह अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये महानगर गॅसचा विस्तार करण्याचे कंपनीचे लक्ष्य होते. मात्र सुरू झालेल्या या प्रकल्पास कल्याण-डोंबिवली परिसरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जमिनीचे वाद, पाइप लाइनच्या कामातील दिरंगाई अशा अनेक अडथळ्यांवर मात करत ही पाइप लाइन शहरामध्ये पोहोचली, मात्र हे काम तेथेच रेंगाळत आहे. अंबरनाथमध्ये मात्र मोकळी जागा मिळाल्याने आणि जागेच्या मालकीचे फारसे अडथळे नसल्याने महानगर गॅसला आपला विस्तार अधिक वेगाने करणे शक्य झाले. अंबरनाथ पूर्व विभागातील सुमारे १५ किलोमीटर परिसरामध्ये गॅस पाइप लाइन टाकण्यात आली आहे. गेल्या मार्च महिन्यांपासून शहरात पाइप लाइनद्वारे गॅस देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत शिवगंगा परिसरात ८०० घरांमध्ये पाइप लाइनद्वारे गॅस पुरवठा होऊ लागला आहे. साई विभाग,  खेर विभाग, आणि मोहनपुरम परिसरातही पुरवठा सुरू झाला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये वडवली येथे ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती महानगर गॅसच्या वतीने देण्यात आली आहे.
मुंबई-ठाण्यात सात लाख ग्राहक
मुंबई, ठाण्यात महानगर गॅसने आपल्या सेवेचा विस्तार अतिशय वेगाने सुरू केला असून ग्राहकांची एकूण संख्या ७ लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामध्ये २२०० हॉटेल्स, रुग्णालये आणि उद्योगांचाही समावेश आहे. सुमारे तीन लाख चार हजारहून अधिक सीएनजी वाहने महानगर गॅसच्या इंधनावर धावत आहेत. १६५ सीएनजी केंद्रांमधून वाहनांना गॅस पुरवठा करण्यात येतो. मुंबई, मीरा भाइंदर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल, खारघर आणि तळोजे या भागांमध्ये टप्प्याटप्याने महानगर गॅस विस्तारणार आहे.   
सातत्य, सुरक्षा आणि स्वस्त
महानगरच्या पाइप लाइनद्वारे पुरवला जाणारा गॅस हा सिलेंडर गॅसच्या तुलनेत स्वस्त आहे. गॅसची निरंतर सेवा पुरवली जात असल्याने सिलेंडरची नोंदणी करणे, सिलेंडर येण्याची वाट पाहणे यांसारख्या कटकटीतून ग्राहकांची सुटका होते. गळतीच्या घटनेची माहिती दिल्यानंतर पंधरा मिनिटांत तात्काळ सेवा पुरवली जात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही ही सेवा उपयुक्त आहे. 

Story img Loader