राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्याला आता साधू-संतांनी विरोध केला आहे. हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. “उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही,” अशी धमकी महंत राजू दास यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महंत राजू दास यांच्या @rajudasayodhya या टि्वटर हँडलवरून ही धमकी देण्यात आली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावरून भरकली आहे. आता उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ देणार नाही.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवसपूर्ती होत असून त्यानिमित्ताने शिवसेना अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने भाजपची कोंडी करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा लावून धरला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राम मंदिराचा प्रश्न सुटला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेची कोंडी होत आहे. निवडणुका झाल्यावर अयोध्येला जाण्याचे ठाकरे यांनी जाहीर केले होते. सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका मवाळ केल्याची चर्चा सुरू झाली होती.

असा आहे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा
उद्धव ठाकरे सात मार्चला दुपारी अयोध्येत श्रीरामांचे दर्शन घेतील व सायंकाळी शरयूतीरी आरती करतील, असे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नेते व अनेक कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत.

यापूर्वीच्या दौऱ्यावेळीही झाले होते संत-महंत नाराज
या दर्शन घ्या, आरती करा… पण अयोध्येत राजकारण करू नका… असं म्हणत अयोध्येतील काही संत-महंतांनी यापूर्वीच्या दौऱ्यावेळीही विरोध केला होता. अयोध्येला राजकारणापासून दूर ठेवा, असंही महंत राजू दास यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात म्हटलं होतं.

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahant raju das opposed maharashtra cm uddhav thackerays ayodhya visit pkd