महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसल्याबरोबर त्यांच्या पगाराचा प्रश्न मिटला, पण कंत्राटदारांच्या थकित देयकांचा विषय अजूनही मार्गी न लागल्याने महापालिकेच्या विकास कामांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिवाळीपूर्वी कंत्राटदारांना त्यांच्या देयकांची रक्कम मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते, पण महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती पाहता कंत्राटदारांना दिवाळीत दिलासा मिळण्याची कोणतीही शक्यता नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. महापालिकेकडे कंत्राटदारांची सुमारे २५ कोटी रुपयांची थकित देयके आहेत. दोन वर्षांपासून ही रक्कम अडकून पडली आहे. कंत्राटदारांनी मध्यंतरीच्या काळात कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना थकबाकीचा पहिला हप्ता देण्यात आला, पण तेव्हापासून आश्वासनेच पदरी पडत आली आहेत, असे कंत्राटदार संघटनेचे म्हणणे आहे.
चार महिन्यांपूर्वी कंत्राटदार संघटनेने २५ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी काम बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी महापालिका प्रशासनाने दिवाळीपूर्वी काही रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते, पण महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित रक्कम न जमा झाल्याने कंत्राटदारांची देयके दिवाळीपूर्वी मिळणार नाहीत, असे संकेत मिळाले आहेत. विकास कामांसाठी योगदान देऊनही देयकांसाठी महापालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागणे खेदजनक असल्याचे कंत्राटदार संघटनेचे म्हणणे आहे.