भटके विमुक्तांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली काल पाडव्याच्या मुहूर्तावर सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानासमोर भटके विमुक्तांची महापंचायत भरविण्याचा बेत पोलीस प्रशासनाने हाणून पाडला. सुमारे पाचशे आदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर उशिरा सर्वाची सुटका केली. पोलिसांच्या दडपशाहीचा ‘उपरा’कार लक्ष्मण माने व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां अॅड. वर्षां देशपांडे यांनी निषेध नोंदविला आहे.
दरम्यान, या प्रश्नावर येत्या १२ डिसेंबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या बारामतीत भटक्यांची महापंचायत भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भटक्या विमुक्त समाजाची सोलापूर ही राजधानी समजली जाते. साठ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापुरात येऊन माजी गुन्हेगार भटक्या विमुक्तांना तारेच्या कुंपणातून मुक्त केले होते. काल पंडित नेहरूंची जयंती होती. त्याचे औचित्य साधून भटके जाती व विमुक्त जमाती संघटनेचे नेते ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी शहरातील सात रस्त्यावरील केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानासमोर भटके विमुक्तांची महापंचायत भरविण्याचे अनोखे आंदोलन हाती घेतले होते. बापट आयोगाच्या अहवालानुसार भटक्या जाती व विमुक्त जमातींना आदिवासींचा दर्जा द्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी भटक्यांच्या महापंचायतीचा बेत आखण्यात आला होता.
या आंदोलनाचा अंदाज घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून पोलीस प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे सात रस्ता परिसरात अक्षरश: छावणीचे स्वरूप आले होते. शिंदे यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी रोखले होते. त्याचवेळी शिंदे व त्यांचे कुटुंबीयही सोलापुरात नसल्यामुळे त्यांचे निवासस्थान बंद होते.
या पाश्र्वभूमीवर ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्यासह अॅड. वर्षां देशपांडे, वर्मा, अर्जुन बाबरे आदी सोलापुरात मोटारीने दाखल होताच पोलिसांनी सर्वाना ताब्यात घेतले. या वेळी लक्ष्मण माने व अॅड. वर्षां देशपांडे यांनी पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ाजवळ प्रतीकात्मक आंदोलन करण्यास परवानगी देण्याची मागणी केली असता पोलिसांनी सर्वाना पार्क चौकात नेले आणि लगेचच ताब्यात घेतले. या आंदोलनाकडे स्थानिक भटके विमुक्त कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली होती. आंदोलनात उतरलेले बहुसंख्य कार्यकर्ते परगावचे होते. पार्क चौकात कार्यकर्त्यांचे जथ्थे जसजसे येऊ लागले तसतसे पोलिसांनी त्या सर्वाना ताब्यात घेतले. यात सुमारे पाचशे कार्यकर्त्यांना बंदिवान करून पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. नंतर सायंकाळी पाचनंतर सर्व आंदोलकांना मुक्त करण्यात आले. दरम्यान, सर्व आंदोलकांनी पोलीस मुख्यालयातच दिवाळी साजरी केली. पोलिसांनीही सर्वाना फराळासह जेवण व चहापानाची व्यवस्था केली होती.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भटक्या विमुक्तांच्या प्रश्नाबद्दल सहानुभूती दर्शवत त्यांच्या मागण्यांना समर्थन देणारे पत्र फॅक्सद्वारे ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांना धाडल्याचे अॅड. वर्षां देशपांडे यांनी सांगितले. विकासाच्या मुख्य प्रवाहात जोपर्यंत भटके विमुक्तांना आणत नाही, तोपर्यंत संपूर्ण समाजाचा व देशाचा विकास होऊ शकत नाही, अशी भूमिका मांडत या लढय़ाला आपला सक्रिय पाठिंबा राहणार असल्याचे अॅड. देशपांडे यांनी
स्पष्ट केले.

Story img Loader