पुरेसे प्रवाशी नसल्याचे खोटे कारण पुढे करून बेस्टची ‘दिंडोशी ते महापे- एल अ‍ॅण्ड टी’ ५२५ एसी बससेवा मिलेनियम बिझनेस पार्कपर्यंतच चालविण्याच्या बेस्टच्या निर्णयाविरोधात महापे- एल अ‍ॅण्ड टीपर्यंत दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तक्रारी करूनही आज- एक मार्चपासून एल अ‍ॅण्ड टीपर्यंतची बससेवा खंडित करून ‘बेस्ट’ने या प्रवाशांना वाऱ्यावर सोडले आहे. यासंबंधात दिंडोशी, वडाळा आणि कुलाबा येथील बेस्टच्या कार्यालयांना असंख्य प्रवाशांनी व्यक्तिगत आणि सामूदायिक सह्य़ांनिशी लेखी निवेदने देऊनही त्याची दखलही न घेता मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या बेस्ट प्रशासनाने आणि महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने हतबल व असहाय प्रवाशांची चांगलीच ‘करून दाखवली’ आहे.
आधीच या मार्गावरील बेस्टच्या ‘भंगार’ एसी बससेवेने हैराण झालेले प्रवाशी दररोजच्या नानाविध त्रासांकडे काणाडोळा करून प्रवास करीत होते. आता तर त्यांना अध्र्या रस्त्यातच सोडून बेस्टने सरळ हात झटकले आहेत.
 या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची १२३ क्रमांकाची खारघर ते बोरीवली व्होल्वो एसी बससेवा अत्यंत उत्तमरीत्या व फायद्यात सुरू असताना बेस्टचीच एसी बससेवा तोटय़ात का जाते, याचा अंतर्मुख होऊन बेस्ट प्रशासन आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी ऊहापोह करायल हवा. परंतु आजवरच्या त्यांच्या बथ्थड प्रतिसादावरून असे काही घडण्याची शक्यता शून्यच आहे.
एल अ‍ॅण्ड टीपर्यंतची बससेवा खंडित केल्याने एमबीपीच्या पुढचे ५२५ एसी बससेवेचे अनेक प्रवाशी आता आपसूकच तुटतील. त्यामुळे ही बससेवा एके दिवशी बंदच करायची पाळी येणार आहे. कदाचित आपल्या भंगार एसी बसेसबद्दलच्या रोजच्या तक्रारींमुळे प्रवाशांच्या शिव्या खात बसण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने प्रवाशी तोडून त्या पूर्णपणे बंद करण्याचा बेस्टचा मानस असावा. एकेकाळी उत्तम सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘बेस्ट’ला शेवटची घरघर लागल्याचेच हे लक्षण आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा