स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भात विविध जिल्ह्य़ात झेंडावंदन आणि आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र दिन चिरायू होवो.. जय जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देत शहरातील शासकीय, निमशासकीय, राजकीय संस्थांसह विविध भागात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कस्तुरचंद पार्कमध्ये झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नागपूर शहराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासाठी मेक इन नागपूर योजना राबविण्यात येईल. नागपूर जिल्ह्य़ातील ३१३ गावांमध्ये जलयुक्त शिवाय योजना पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार असून या गावांना कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त मुक्त करण्याची योजना आहे. ४ वर्षांत १८०० गावे या योजने अंतर्गत दुष्काळ मुक्त करण्यात येणार आहे. मराठवाडा आणि विदर्भाचा २ लाख कृषी पंपाचा बॅकलॉग दोन वर्षांत भरून काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका व रास्तभाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने दिलेली प्रत्येक योजना जिल्ह्य़ाच्या विकासासाठी राबवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यावेळी पोलीस आयुक्त कार्यालयातील विनोद वानखेडे, माताप्रसाद रामलाल पांडे, प्रभाकर नांदे, रमेश धावंडे, अदपक राममूर्ती, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दिगंबर चव्हाण, हरपाल इखार, रमाकांत बावीस्कर, सीमा अख्तर यांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय महसुल विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. माऊंट कारनेल हायस्कूलची कु. सलोनी तऱ्हाटे हिला राष्ट्रपती पुरस्कार प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या ग्राम पंचायतींना पर्यावरण विकासरत्न पुरस्कार वागधरा व नांदगाव या ग्राम पंचायतींना देण्यात आला आहे. कार्यक्रमाचे समालोचन वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळीवकर यांनी केले. महापालिकेच्या सिव्हील लाईन कार्यालयात महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, सुनील अग्रवाल, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपआयुक्त प्रमोद भुसारी यांच्यासह महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शहर शिवसेनेतर्फे जिल्हा अध्यक्ष सतीश हरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध भागातील चौकात कार्यकर्त्यांंनी नागरिकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी शहरातील विविध चौकात डीजेवर महाराष्ट्र गीते वाजवण्यात येऊन वातावरण निर्मिती करण्यात आली. रेशीमबागेतील शिवसेना कार्यालयासमोर फटाक्याची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र दिनाचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वर्धा रोड आणि लक्ष्मीभवन चौकात पूर्व विदर्भ प्रमुख हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा